धाराशिवचे तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे व फड यांचा कारनामा – अडचणीत वाढ, आमदार सुरेश धसांची तक्रार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषद अंतर्गत कोट्यावधी रुपयांच्या घोटाळा तक्रार प्रकरणी विशेष लेखापरीक्षणाला 27 ऑक्टोबर पासुन सुरुवात झाली आहे मात्र संचिका व इतर कागदपत्रे उपलब्ध करून न दिल्याने लेखा परीक्षण रखडले आहे. संचिका व कागदपत्रे गहाळ असल्याची सूत्रांची माहिती असुन या प्रकरणी गुन्हा नोंद होणार का हे पाहावे लागेल. काही संचिका पुन्हा नव्याने तयार करण्याची व्युव्हरचना आखली असुन त्यामुळे काही संचिका नव्याने अवतरु शकतात. यापुर्वी देखील काही गहाळ व्हाऊचर अचानक सापडले होते.
स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाचे सहायक संचालक ज्ञानेश्वर सुळ यांनी नगर परिषद मुख्याधिकारी नीता अंधारे यांना 31 ऑक्टोबर रोजी लेखी पत्र काढले आहेत. आमदार सुरेश धस यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर त्यांच्या मागणीनुसार लेखापरीक्षण होत आहे. तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे व वसुधा फड यांच्या कार्यकाळातील लेखापरीक्षण होत आहे. संचिका उपलब्ध कराव्यात यासाठी पत्र व्यवहार सुरु आहे तर संचिका शोधासाठी धावपळ सुरु आहे.
लेखा परीक्षणाचे काम योग्य प्रकारे पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या लेख्यांच्या संबंधातील सर्व प्रमाणके, किर्द, धनादेश, संचिका, आवश्यक नोंदवह्या, मोजमाप पुस्तीका, विवरणपत्रे, पत्रव्यवहार, टिपण्या किंवा इतर संबंधित सर्व दस्तऐवज विहीत वेळेत उपलब्ध करुन देण्यात यावे असे त्या पत्रात नमुद आहे. लेखापरीक्षकांनी दिलेल्या अर्धसमास पत्रामध्ये नमुद केलेल्या हरकती ताबडतोब निकाली काढाव्यात असे म्हण्टले आहे.
आमदार सुरेश धस यांच्या मागणी व तक्रारीनुसार विशेष लेखापरीक्षण होत असुन तसे आदेश स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहसंचालक दीपाराणी देवतराज यांनी स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक यांना दिले आहेत. 7 अधिकारी यांचे पथक विशेष लेखा परीक्षण करणार असुन त्यात नांदेड, सोलापूर, जालना जिल्ह्यातील अधिकारी यांचा समावेश आहे.
आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगरपरिषदेचे जुलै 2020 ते 23 डिसेंबर 2022 या काळातील विशेष लेखापरीक्षण करावे अशी मागणी केली होती त्यानुसार हे करण्यात येणार आहे. या काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व गैरव्यवहार झाल्याचा आरोप धस यांनी केला होता. तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे व वसुधा फड यांच्या कार्यकाळातील परीक्षण होणार आहे. यलगट्टे यांच्यावर गुन्हे नोंद होऊन त्यांना काही महिने जेलमध्ये राहवे लागले त्यानंतर त्यांचे निलंबन झाले तर फड यांची कारकीर्द वादग्रस्त राहिली.
विशेष लेखापरीक्षणासाठी ज्ञानेश्वर सुळ, सहायक संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, धाराशिव हे पथक प्रमुख राहतील. डी आर शिनगारे, सहायक लेखापरीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखापरीक्षा, नांदेड, बा भा भारती, वरिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सोलापुर, बी एस मलाव, वरिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, सोलापुर, सुदाम वाघमारे, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, नांदेड, आकाश वर्मा, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, जालना व सुशिल कुलकर्णी, कनिष्ठ लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखापरीक्षा, जालना अश्या 7 जणांचा समावेश आहे.












