धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीत प्रारूप मतदार याद्यात मोठा घोळ झाल्याची बाब समोर आल्यानंतर हे प्रकरण जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी गांभीर्याने घेतले असुन मुख्याधिकारी नीता अंधारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, त्यांच्यावर बेजबाबदारपणाचा ठपका ठेवला आहे. 2 दिवसात समक्ष स्वयंस्पष्ट खुलासा सादर न केल्यास कार्यवाहीचा इशारा देखील दिला आहे. राज्य निवडणुक आयोगाशी निगडीत विषय असल्याने हे प्रकरण अंगलट येऊ शकते.
मतदार याद्याच्या घोळावरून महायुतीचे भाजप व महाविकास आघाडी यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असुन कलगीतुरा रंगला आहे. हे का ? कसे व कोणामुळे घडले यावर अंधारे काय खुलासा करतात याकडे लक्ष लागले आहे. धाराशिव जिल्ह्यातील फक्त धाराशिव नगर परिषद मतदार यादीत घोळ झाला आहे त्यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
नगर परिषद यादीचे विभाजन करून मतदार यादी अधीप्रमाणित करून त्याची अभिरक्षा करण्याची जबाबदारी राज्य निवडणुक आयोगाने मुख्याधिकारी यांच्याकडे सोपावली होती, त्यानुसार 2025 च्या धाराशिव नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. प्रारुप मतदार यादी तयार करताना मुळ प्रभागातील मतदार हे अन्य प्रभागामध्ये समावेश करणे, प्रभागातील मतदार संख्या कमी दर्शविणे, मतदारांची नावे दुबारा दर्शविणे याबाबी शहरातील लोकप्रतिनिधीनी निदर्शनास आणुन दिल्याचे जिल्हाधिकारी यांनी नोटीसीत नमुद केले आहे.
मतदार यादी कार्यक्रम राबविताना मुख्याधिकारी यांनी मोठया प्रमाणात दुर्लक्ष करणे, मतदार यादी सदोष तयार करणे, अनुसूचित जातींच्या प्रभागातील मतदार कमी दर्शविणे अशा बाबी प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीमध्ये झालेचे दिसून येते. राज्य निवडणुक आयोगाच्या आदेश व सुचनाकडे दुर्लक्ष करुन निवडणुकीसारख्या महत्वाच्या कामकाजात गांभीर्य नसल्याचा ठपका जिल्हाधिकारी यांनी ठेवला आहे.
या सगळ्या बाबीस जबाबादार धरुन आपले विरुध्द राज्य निवडणुक आयोगचे नियम व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम, 1976 मधील तरतुदीनुसार कार्यवाही का प्रस्तावीत करण्यात येऊ नये ? याबाबतचा स्वयंस्पष्ट खुलासा 2 दिवसात समक्ष सादर करावा. मुदतीत खुलासा मुदतीत न प्राप्त झाल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे गृहीत धरून किंवा तो असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्यास योग्य ती कार्यवाही प्रास्तावित केली जाईल असा इशारा दिला आहे.