सुधारणा करू – जोमाने मैदानात उतरू, खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटीलांचा संकल्प
धाराशिव – समय सारथी
लोकशाहीमध्ये जनतेचा कौल अंतिम असतो आणि तो आम्ही पूर्णपणे मान्य करतो. या निवडणुकीत आमच्या कार्यकर्त्यांनी जिवापाड मेहनत घेतली, घराघरात जाऊन पक्षाची भूमिका पोहोचवली, तर उमेदवारांनीही प्रचंड आत्मविश्वासाने आणि पूर्ण ताकदीने लढत दिली. तरीही जो निकाल लागला, तो मनाला वेदना देणारा आणि निराशाजनक आहे, हे नाकारता येणार नाही असे म्हणत आमदार कैलास पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
सर्वसामान्य घरातील, रस्त्यावर उतरून पक्षासाठी झटणारे, कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त निष्ठेने काम करणारे शिवसैनिक आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका आमची आणि पक्षाची होती. मात्र आजचा निकाल हा अशा प्रामाणिक आणि कष्टकरी कार्यकर्त्यांच्या मनोबलावर घाव घालणारा ठरला आहे असे पाटील म्हणाले.
धाराशिव आणि कळंब शहरातील जनतेविषयी आमच्या मनात कोणताही आक्षेप नाही. जनतेने जो निर्णय दिला आहे, तो आम्ही विनम्रपणे स्वीकारतो. या पराभवाची संपूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. पराभव शेवट नाही, शिवसैनिकांनी आणि सहकारी पक्षातील कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये.. आपण आत्मचिंतन करू, चुका ओळखू, आवश्यक त्या सुधारणा करू आणि पुन्हा नव्या उमेदीने, नव्या जोमाने मैदानात उतरू असा संकल्प केला.
संघर्ष हीच आपली ओळख आहे आणि संघर्षातूनच विजयाचा नवा इतिहास घडवू.. धाराशिव-कळंब नगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले.











