अर्थकारण – वैयक्तिक लाभाची योजना, मी धाराशिवचा आमदार नाही तरीही निधी आणला, उपकृत भावना
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील 140 कोटी रुपयांच्या कामाला देण्यात आलेले कार्यारंभ आदेशाला नगर विकास विभागाने स्थगिती दिली आहे. नगर विकास विभागाचे पत्र व खुद्द उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भ्रमणध्वनीवरील निर्देशानंतर धाराशिव नगर परिषदेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांनी ठेकेदार डी सी अजमेरा यांना स्थगिती दिल्याचे व काम सुरु न करण्याचे पत्र काढले आहे. उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाची मुख्याधिकारी यांनी तात्काळ अंमलबजावणी केली आहे.
कार्यारंभ आदेश देताना मोठे ‘अर्थकारण’ झाल्याचा आरोप पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केला होता. या कामाची पुन्हा निविदा काढल्यास राज्य सरकार व नगर परिषदेचे काही कोटी रुपये वाचतील अशी पालकमंत्री यांची भुमिका असुन त्यांनी 2 वेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. त्यानुसार शिंदे यांनी तसे निर्देश सुद्धा दिले आहेत.
पुन्हा निविदा काढल्यास स्पर्धा होईल व निविदा दरापेक्षा कमी दराने ही निविदा जाऊ शकते त्यामुळे काही कोटी वाचतील. अजमेरा ठेकेदार यांना सुरुवातीला 15 टक्के ज्यादा दराने काम मंजुर करण्यात आले होते, त्यामुळे नगर परिषदेचे अंदाजे 22 कोटींचे नुकसान होणार होते मात्र वाढीव निविदा दराने नकार दिल्यावर अजमेरा हे आहे त्या दराने अर्थात 140 कोटीत काम करायला तयार झाले याचा अर्थ नगर परिषदेचे 22 कोटी वाचले. यासाठी महाविकास आघाडीने आंदोलन व शिवसेना उबाठा गटाने आमरण उपोषण केले होते.
नवीन निविदा निघाल्यास सुधारित दारामुळे हे काम 140 कोटी वरून काही कोटी वाढेल मात्र अजमेरा हे आहे त्या 140 दराने काम करण्यास तयार झाले आहेत त्यामुळे 60 कोटी वाचतील असा ‘डंका’ आमदार राणाजगजीतसिंह पाटील पिटत आहेत. मात्र गेल्या 2 वर्षांपासून सुधारित दर झाले नाहीत त्यामुळे आमदार राणा यांचा पैसे वाचवल्याचा दावा फोल ठरत असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. जीएसटी दर कमी झाले आहेत त्यामुळे निविदा रक्कम कमी होईल व स्पर्धेमुळे कमी दराने निविदा येऊ शकते, असे आमदार कैलास पाटील यांचे म्हणणे आहे.
वरील 3 मुद्यावर व पालकमंत्री सरनाईक यांनी 2 वेळेस केलेल्या लेखी तक्रारी व त्यातील मुद्दे व भुमिका यावर आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे मुद्देसूद बोलायला तयार नाहीत, पत्रकार यांच्या प्रश्नांना ‘किरकोळ’ समजून राजकीय ‘विषयांतर’ सुरु आहे.
मी धाराशिवचा ‘आमदार’ नाही, मी तुळजापूरचा आमदार आहे मात्र तरी देखील अथक प्रयत्नाने निधी आणला असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील सांगत असुन ‘उपकृत’ भावना व्यक्त करीत जनतेचा कळवळा असल्याचे दाखवत आहेत. एरव्ही आमदार पाटील हे धाराशिव कळंब सह अख्या जिल्ह्यातील 4 ही मतदार संघावर किंबहुना शेजारील लातूर सह मराठवाड्यावर ‘अधिराज्य’ गाजवतात.
‘मित्रा’चे उपाध्यक्ष माध्यमातून आढावा बैठका, निर्णयाच्या प्रेस नोट देत तर कधी फेसबुक लाईव्ह तर भुम परंडा येथे नुकसान आढावा बैठका घेतात मात्र यावेळी पहिल्यांदा त्यांच्या तोंडून धाराशिवचा ‘आमदार’ नसल्याची भावना व्यक्त होणे हे न पटणारे आहे, यातच सर्व काही आले असे खासदार ओमराजे म्हणतात.
अजमेरा हे एकमेव ठेकेदार शहराचा विकास व चांगले काम करू शकतात अशी काहीशी पक्की ‘धारणा’ आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची झाली असुन त्यांना काम द्यावे असा राज’हट्ट’ आहे. त्यांच्यासाठी ही वैयक्तिक लाभाची किंवा स्वार्थाची आर्थिक योजना असू शकते असा आरोप खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी केला आहे.
राणा यांचा यात स्वार्थ आहे, यातील एकही काम इतर ठेकेदार किंवा कार्यकर्ते यांना मिळणार नाही मात्र ते शहराचा, पक्ष कार्यकर्ते, जनतेचा व विकासाचा कळवळा असल्याचे दाखवत अजमेरा यासाठी हट्ट करीत आहेत. त्यांनी इतका कळवळा करून स्वतःला त्रास करून घेऊ नये, धाराशिवचे आमदार त्याला खंबीर आहेत, असा सल्ला ओमराजे यांनी दिला. हा विषय सार्वजनिक असल्याचे दाखवीत त्या आड ते स्वार्थ साधत आहेत, त्यांनी आमने सामने चर्चेची वेळ व ठिकाण सांगावे, त्यांना जमत नसेल तर मी सांगतो असे ओमराजे म्हणाले.










