धाराशिव – समय सारथी
माझे आत्तेमामा, महाराष्ट्राच्या राजकारणात धाडसी निर्णय, कणखर नेतृत्व आणि विकासाची स्पष्ट दिशा देणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले, त्यांना भावपुर्ण श्रद्धांजली असे म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
सहकार, जलसंपदा, वित्त आणि प्रशासन या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी उभे राहिलेले जलसिंचन प्रकल्प, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी घेतलेली ठाम भूमिका, अर्थसंकल्प मांडताना दाखवलेली आर्थिक शिस्त आणि निर्णयक्षमतेचा वेग हे सगळे महाराष्ट्राने जवळून अनुभवले आहे.
“काम बोला” ही त्यांची भूमिका केवळ घोषणा नव्हे, तर कृतीतून दाखवलेली कार्यसंस्कृती आहे. टीका, संघर्ष आणि राजकीय वादळांमध्येही त्यांनी कधी कामाची दिशा बदलू दिली नाही. राज्याच्या विकासासाठी कठोर निर्णय घ्यावे लागले, तरी मागे न हटता त्यांनी जबाबदारी स्वीकारली. सामान्य कार्यकर्त्यापासून ते प्रशासनातील अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकाकडून काम करून घेण्याची त्यांची शैली, वेळेचे काटेकोर नियोजन आणि स्पष्ट शब्दांत बोलण्याची सवय हीच त्यांची खरी ओळख.
महाराष्ट्राच्या राजकारणात एक स्पष्ट, प्रभावी आणि अनुभवसंपन्न नेतृत्व म्हणून अजित पवारांचे योगदान कायम स्मरणात राहील असे म्हणत शिवसेना उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी श्रद्धांजली अर्पण केली.












