धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभा निवडणुकीत महायुतीचा उमेदवार अद्याप ठरला नसुन भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटात जोरदार रस्सीखेच सुरु आहे. माजी सनदी अधिकारी तथा मित्रा या उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी हे धाराशिव लोकसभा निवडणुक लढविण्यास उत्सुक असुन भाजप कडुन त्यांचे नाव आघाडीवर असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडुन देखील त्यांच्या नावाला पसंदी देण्यात आली आहे, राष्ट्रवादीच्या संभाव्य यादीत देखील त्याचे नाव असल्याचे समोर आले आहे त्यामुळे ते राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुक लढवू शकतात. जागा राष्ट्रवादीला सुटल्यास परदेशी उमेदवार असतील अशी सूत्रांची माहिती आहे. परदेशी यांची भाजपला पसंती आहे मात्र जागा वाटपात तह होऊ शकतो.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने 7 जागांवर दावा केला आहे त्यात धाराशिव लोकसभेची जागा आहे, त्यात बारामती सुनेत्रा पवार, रायगड सुनील तटकरे, शिरूर आढळराव पाटील, सातारा उद्ययन राजे, गडचिरोली धर्मराव बाबा आत्राम, धाराशिव प्रवीणसिंह परदेशी अशी नावे चर्चेत आहेत. परभणी जागा महादेव जानकर यांना दिली आहे.
धाराशिव लोकसभेसाठी सेवानिवृत्त आयएएस अधिकारी प्रवीण परदेशी यांचे एकप्रकारे राजकीय लॉंचिंग व चाचपणी भाजपकडून केली जात आहे. राजकीय नेत्या ऐवजी सेवानिवृत्त अधिकारी या पर्यायाची चाचपणी या माध्यमातून भाजपकडुन केली जात आहे. मोदी यांनी अश्विनी वैष्णव, एस सुब्रह्मण्यम जयशंकर यासारख्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट केंद्रीय मंत्री केल्याचा दाखला देत मोबाईल फोन द्वारे फोन करुन सर्वेक्षण केले गेले आहे.
परदेशी यांचा धाराशिव लोकसभेचा वाढता जनसंपर्क –
परदेशी हे भूकंप काळात लातूरचे जिल्हाधिकारी होते. धाराशिव हा आकांक्षित जिल्हा असुन त्याचा आधार घेत विविध शासकीय योजना अंमलबजावणीसाठी त्यांचा धाराशिव जिल्ह्यातील वावर वाढला आहे. प्रशासकीय बैठका, महिला मेळावे, आढावा बैठक तसेच गाठीभेटी यावर भर दिला आहे. कृष्णा खोरे पाणी, धाराशिव जिल्हा रुग्णालय, सोलर प्रकल्प, टेक्निकल टेक्स्टईल पार्क या विषयावर मार्ग काढण्यात परदेशी यांचा सहभाग दिसून येत आहे.
परदेशी यांचा परिचय –
63 वर्षीय प्रवीण परदेशी हे 1985 बॅचचे महाराष्ट्र केडरचे सेवानिवृत्त वरिष्ठ आयएएस अधिकारी असुन सध्या ते निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात सुरु असलेल्या ‘मित्रा’ उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.फडणवीस यांचे ते अत्यंत जवळीक व विश्वासू म्हणून ओळखले जातात.
तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख व देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाचा कारभार पाहिला आहे. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे ते अधिकारी असुन मुख्य सचिव पदाने हुलकावणी दिल्याने ते केंद्रात जाऊन सेवानिवृत्त झाले. मित्रा उपक्रमावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी 3 वर्षासाठी त्यांची नेमणूक केली आहे.
लातूर येथील 1993 मधील भूकंप काळात ते जिल्हाधिकारी होते, भूकंपातील पुनर्वसन व जागतिक बँकेकडून मिळालेली मदत यात त्यांचा मोठा वाटा आह. अर्थशास्त्र व लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिकस येथे त्यांनी सामाजिक निती, भागीदारी योजना व आर्थिक विकास या विषयात मास्टरेट केली आहे. पनवेल, रायगड अमरावती, सोलापूर, लातूर, पुणे, मुंबई या ठिकाणासह त्यांनी वन पर्यावरण, वित्त, शहर विकास, महसूल विभागात व परदेशात 36 वर्ष सेवा केली आहे.भूकंप, केरळ आपत्ती, कोरोना काळात त्यांचे कार्य उल्लेखनीय राहिले आहे