धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी गौरी व कालिका कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला असला तरी ते सुरुच आहेत. जिल्हाधिकारी यांनी दिलेले लेखी आदेश संबंधित कला केंद्र चालक मालक यांना अप्राप्त आहेत, नेमका हाच कायदेशीर मुद्दा पुढे करीत कला केंद्र सुरु आहेत. आम्हाला आदेशच मिळाले नाहीत, मग काय? जिल्हाधिकारी यांनी कधी परवाना रद्द केला हे माहिती नाही, बातमीतुनच कळाले आहे. आम्हाला आदेश मिळाले नाहीत त्यामुळे आम्हाला ते कायदेशीर बंधनकारक नाहीत त्यामुळे कला केंद्र सुरु ठेवली आहेत अशी ‘ठोस’ भुमिका घेतली आहे.
जिल्हाधिकारी यांनी 17 सप्टेंबर रोजी आदेश काढले त्यानंतर या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची व ते सील करण्याची जबाबदारी संबंधित तहसीलदार यांची होती. दिवाळी निमित्त एकच कामकाजाचा दिवस होता, शिवाय काही महिला नर्तिका तिथे राहत होत्या. आदेश कला केंद्राना मिळाले नाहीत, नेमक्या याच दिरंगाईचा ‘फायदा’ कला केंद्र चालक मालक यांनी घेतला आहे. आम्हाला काहीच माहिती नाही, जसे काही घडलेच नाही या भूमिकेत राहून कला केंद्र सुरु ठेवले आहे यामुळे प्रशासन चांगलेच तोंडावर पडले आहे.
मुळात जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यानंतर पिंजरा कला केंद्र प्रमाणे गौरी व कालिका कला केंद्र पंचनामा करून सील करणे अपेक्षित होते मात्र दिवाळी व पुरग्रस्त शेतकरी मदत या कामात प्रशासन गुंतलेले असताना आदेश मिळाला नाही हा कायदेशीर तांत्रिक मुद्दा समोर करीत संबंधित अधिकारी यांची ‘गोची’ केली आहे. पिंजरा बाबतीतही माध्यमात चर्चा झाल्यावर ते सील केले गेले. अप्राप्त आदेशाचे कारण वरदान ठरले आहे.
एरव्ही डीजे, बंद खोलीत नृत्यसह अनेक नियमाचा ‘भंग’ करणाऱ्या कला केंद्र चालकांनी ‘सजग’ होत प्रशासनाच्या कायदेशीर मुद्यावर ‘बोट’ ठेवत ‘नियम’ शिकवला आहे. ऐन दिवाळीत तिथे छमछम सुरु राहिल्याने नागरिकांत सुद्धा संभ्रम निर्माण झाला आहे. आदेशाची अंमलबजावणी होण्यास उशीर का झाला? त्याला जबाबदार कोण? कला केंद्र कधी सील करणार? जिल्हाधिकारी काय भुमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
तुळजाई, पिंजरा, साई, गौरी व कालिका अश्या 5 केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला असुन साई व पिंजरा कला केंद्र पंचनामा करून ‘सील’ केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला तुळजाई कला केंद्राने ‘आव्हान’ दिले असुन आता हे प्रकरण छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्ताच्या कोर्टात जाणार आहे. नर्तिका पुजा गायकवाड ही आत्महत्यास प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यात जेलमध्ये आहे. तिथे पोलिस व महसूल विभागाची भुमिका व म्हणणे महत्वाचे आहे. या निर्णयावर इतर केंद्राचे भवितव्य ठरणार आहे.
अनेक कुटुंब उध्वस्त व तरुणाई आहरी जात असल्याने धाराशिव जिल्हा कला केंद्र ‘मुक्त’करण्याचा संकल्प पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी केला आहे. प्रशासनातील काही, स्थानिक व गाव पुढारी यांचा मात्र कायम आशीर्वाद आहे. महाकाली या केंद्रचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला असुन या कला केंद्र बाबत प्रकरण उच्च न्यायालयात असुन तिथे शपथपत्र दिले जाणार आहे.
काही कला केंद्रावरील महिला खुन, आत्महत्यास प्रवृत्त केल्यासह पिटा अनैतिक गुन्ह्यात अडकल्या असुन तसे गुन्हे नोंद आहेत, या सगळ्यांची जंत्री तयार करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. कायदेशीर बाबी कोर्टासह अपील अधिकारी यांच्याकडे मांडणे महत्वाचे ठरणार आहे. कला केंद्र चालक यांना केंद्र सुरु करण्याची घाई असुन धावपळ सुरु आहे, त्यांनी नियमावर ‘बोट’ ठेवायला सुरुवात केली आहे.












