तुळजाई, महाकाली केंद्र वादाच्या भोवऱ्यात – अनेक घटना, ठोस कारवाई कधी ? तरुण पिढी बरबाद
धाराशिव – समय सारथी
सांस्कृतीक कला केंद्राचं धाराशिव अशी जिल्ह्याची ओळख बनत चालली असुन जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सध्या जवळपास 6 कला केंद्र सुरु असुन 5 प्रस्ताव परवानगीसाठी आहेत तर जवळपास 5 ठिकाणी बांधकाम व इतर यंत्रणा उभी करण्यात आली आहे. कला केंद्राना तुळजाई, कालिका, महाकाली अशी देवी देवतांची नावे दिली असुन प्रत्यक्षात मात्र आत ‘बाजार’ मांडून अश्लील प्रकार होत असल्याचे अनेकदा कारवाईतुन समोर आले आहे. पोलिस व महसूल विभागाचे त्यांना अभय असल्याचे दिसते.
एरव्ही आवाज उठवणारे लोकप्रतिनिधी मात्र या विषयात गप्प आहेत. तुळजाई, महाकाली केंद्र वादाच्या भोवऱ्यात असुन हाणामारी, गोळीबार सारख्या घटना घडल्या आहेत. या ठिकाणी असलेल्या काही नर्तकी गंभीर गुन्ह्यात आरोपी आहेत तर इथे अनेक सराईत गुंडाचा ‘राबता’ असतो. काही नर्तकी वेश्या व्यवसाय करताना पोलिसांनी पकडले असुन या सर्व प्रकारामुळे अश्या कला केंद्रावर ठोस कारवाई कधी ? हा प्रश्न विचारला जात आहे. या कला केंद्रामुळे तरुण पिढी ‘पिंजऱ्यात’ अडकली असुन आर्थिक दृष्ट्या बरबाद व व्यसनांध झाली आहे.
कला केंद्राच्या नावाखाली ‘छमछम’ बार चालून चांगली आर्थिक कमाई होत असल्याने काही पांढर पेशी (व्हाईट कॉलर) लोकांनी यात छुपी गुंतवणुक केल्याची माहिती असुन त्यांनी नवीन अत्याधुनिक कला केंद्रचे बांधकाम केले आहेत. जिल्हा प्रशासनाकडे कळंब तालुक्यातील वडगाव ज येथे रेणुका कला केंद्रसाठी परवाना मिळावा म्हणुन येडशी येथील सतीश वामन जाधव यांनी अर्ज केला आहे तर लोकनाट्य कला केंद्रसाठी बाबासाहेब गाठे व सोलापूर बाळे येथील अक्षय साळुंके, तुळजापूर तालुक्यातील धनगरवाडी येथे चंद्राई कला केंद्र पुर्ववत सुरु करण्यासाठी अरविंद गायकवाड, आळणी येथे प्यासा केंद्र सुरु करण्यासाठी श्रीपाल वीर व भाटशीरपुरा येथील शितल गायकवाड यांनी, वडगाव ज येथे अंबिका कलाकेंद्रासाठी येडशी येथील नानासाहेब पवार यांनी प्रस्ताव दिला आहे मात्र प्रशासनाने ठोस भुमिका घेतल्याने परवानगी दिली नाही.
उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्र राज्यभर चर्चेत आले आहे, इथे यापूर्वी देखील हाणामारीच्या घटना व त्यातून गुन्हे दाखल झाले आहेत. महाकाली कला केंद्राच्या परवान्याचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचे जिल्हाधिकारी प्रशासनाकडुन सांगण्यात येत आहे, इथे सुरु असलेल्या प्रकाराचा सविस्तर अहवाल कोर्टात सादर करणार असल्याची माहिती आहे.
महाकाली केंद्रात 2 गटात वाद झाला त्यातून जीवघेणा हल्ला झाला, गोळीबारही झाला होता. महाकाली कला केंद्रातील सरोज चिकुंद्रे, रेणु पवार आणि निता जाधव या 3 नर्तकी महिला उमरगा येथील अभिषेक कालिदास शिंदे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणाच्या हत्येत आरोपी असुन पोलिसांनी अटक केली आहे. काही कला केंद्रात काही बेधुंद ग्राहक नर्तकींना मारहाण व इतर त्रास देतात मात्र व्यवसाय व दबावामुळे प्रकरण दडपले जाते, तिथेही त्या असुरक्षित असतात हे सत्य आहे.
धाराशिव संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाला लागून ही कला केंद्र असुन काही केंद्र अवैध धंदे व गुन्हेगारीचे अड्डे बनले आहेत. डीजेचा सर्रास वापर, दारू विक्री, अवैध प्रकार राजरोस घडत असुन त्याकडे पोलिस व महसुल विभाग कानाडोळा करीत आहे. काही केंद्रामुळे गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत. या नवीन फोफावलेल्या संस्कृतीला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.