धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील सांस्कृतीक कला केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द केल्याच्या निर्णयाला काही कला केंद्र चालक मालक यांनी आव्हान दिले असुन त्याची सुनावणी विभागीय आयुक्त यांच्याकडे पुर्ण झाली असुन आता ते काय निकाल देतात याकडे लक्ष लागले आहे. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार व पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या वतीने महसूल व पोलिस विभागाने त्यांची बाजु मांडली तर कला केंद्रच्या वतीनेही बाजु मांडली. जिल्हाधिकारी यांचा निकाल कायम राहतो की कला केंद्रच्या नावावर ‘छमछम’ पुन्हा सुरु होणार हे निकालानंतर ठरणार आहे.
तुळजाई, पिंजरा व गौरी या 3 कला केंद्रानी जिल्हाधिकारी यांच्या निर्णया विरुद्ध विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केले आहे. सुनावणी पुर्ण झाली असुन हे प्रकरण आता निकालासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. तहसीलदार प्रकाश मेहेत्रे यांनी बाजु मांडली. दोन्ही बाजूनी त्यांचे म्हणणे मांडले आहे. कला केंद्रात नियमांचा भंग, काही गुन्हे नोंद असल्याने पोलीस अधीक्षक रितु खोखर यांनी परवाने रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती त्यानंतर त्यांनी ते कायमस्वारी रद्द केले होते.
उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणात नर्तिका पुजा गायकवाड हिचे नाव आल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई हे कला केंद्र राज्यभर चर्चेत आले होते. पुजा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.
तुळजाई कला केंद्रावर झालेल्या हाणामारीच्या घटना व गुन्हे, पुजा गायकवाड हिचा व आत्महत्या प्रकरणाचा संदर्भ, दारू विक्री, रात्री उशिरा सुरु असणे, डीजेचा सर्रास वापर, स्थानिक महिला व ग्रामस्थाचा विरोध, विविध संघटना यांच्या तक्रारी, कला केंद्रात महिला नर्तकी यांची झालेली छेडछाड व त्या असुरक्षित असणे यासह अन्य कारणे व कागदपत्रांची जंत्री अहवालासोबत जमा केली होती.
परवाना रद्द केल्यानंतर सुद्धा तुळजाई कला केंद्राची ‘दबंगगिरी’ सुरूच होती. तक्रार केल्याचा राग मनात धरून स्वाती जोगदंड या महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केल्या प्रकरणी निलेश जोगदंड, सुशांत उंदरे,धनंजय मोटे व गणेश मोटे यांच्यावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.












