धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर विकास, विविध कामे करण्याची स्वप्ने नागरिकांना दाखवली जात आहेत. सत्ताधारी भाजप शिवसेना महायुती सरकार आता विकासाची चिंता व काळजी असल्याचे दाखवीत आहे मात्र याच सरकारने धाराशिव शहरातील करोडो रुपयांच्या विकास कामांना स्थगिती देण्याचे ‘काम’ केल्याचे समोर आले आहे. शहरातील उद्यान, आठवडी बाजार या करोडो रुपयांच्या कामांना स्थगिती दिली असल्याने ही कामे झाले नाहीत मात्र आता तीच कामे आम्ही करू असे आश्वासन प्राधान्याने दिले जात आहे.
धाराशिव शहरात लहान मुलांना खेळण्यासाठी एकही अद्यावत गार्डन नाही. रस्तेसह अन्य विकास कामे रखडल्याने शहर भकास झाले असुन नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. ‘लाडका ठेकेदार’ हवा या राज अट्टाहासपोटी 140 कोटींचे काम प्रलंबित पाडले गेले तर राजकीय श्रेयवाद कुरघोडी यातून 256 कोटी रुपयांच्या कामाची तक्रार आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केल्याने स्थगिती मिळाली, त्यातील काही मोजक्या कामांची स्थगिती उठली मात्र इतर निधी तसाच आहे.
धाराशिव शहरातील नगर परिषद शाळा क्रमांक 11 व शाळा क्रमांक 18 येथील उद्यानाचा विकास करण्यासाठी प्रत्येकी 2 कोटी असे 4 व शहरातील जिजामाता उद्यानाचा विकास करण्यासाठी 3 कोटी असे 7 कोटी रुपये वैशिष्ट्यपुर्ण योजने अंतर्गत मंजुर करण्यात आले होते. तर धाराशिव शहरातील. आठवडी बाजार विकसित करण्यासाठी 5 कोटी रुपये असे 12 कोटी रुपयांची कामे 3 नोव्हेंबर 21 व 11 एप्रिल 2022 रोजी मंजुर करण्यात आले होती मात्र या कामांना 8 ऑगस्ट व 20 सप्टेंबर 2022 च्या निर्णयानुसार स्थगिती देण्यात आली
महाविकास आघाडी सरकार असताना या विकास कामांना मंजुरी देण्यात आली मात्र त्यानंतर 30 जुन 2022 रोजी सत्ता परिवर्तन होऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यावर या विकास निधीला जाणीवपूर्वक स्थगिती दिली असल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. सत्ता यांचीच व यांनीच स्थगिती दिली आणि आता हेच लोक विकास करू असे म्हणत असुन हे अतिशयोक्ती असुन जनतेची फसवणूक व दिशाभूल आहे.
स्थानिक विकास कामांना देण्यात आलेली स्थगिती उठवावी यासाठी धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी नगरविकास विभागाला अनेक वेळा पत्र दिले त्याच बरोबर विधीमंडळात तारांकीत प्रश्न उपस्थितीत केला. याचिका दाखल केल्यावर सरकारने कोर्टात देखील सकारात्मक भुमिका मांडली मात्र स्थगिती उठवून निधी काही दिला नाही असेही ते म्हणाले.
धाराशिव शहरातील जिजामाता उद्यानसह अन्य भागात घाणीचे साम्राज्य पसरले असुन उद्यानाचा उकिरडा झाला आहे. काही लोखंडी खेळणी भंगार झाली असुन त्या सांगाडयांना पुरातन रूप आले असुन आजवर केलेल्या विकासाच्या दाव्याचे ते खरे ‘साक्षीदार’ आहेत. याच उद्यान भागात नियमित भाजी पाला, फळ विक्रीचा बाजार भरतो हे विशेष. या ठिकाणी झाडें झुडपे वाढली असुन इथले ‘भकास’ चित्र ड्रोन न लावता दिसू शकते. केवळ गप्पा व विकासाचा दावा निवडणुकीच्या तोंडावर केला जातो.
आठवडी बाजाराचे सुद्धा हेच हाल असुन या भागात नालीच्या कडेला भाजी पाला विक्री केली जाते. धाराशिवकर रोज जी ताजी व स्वच्छ आरोग्यवर्धक भाजी म्हणुन भाजी फळे खातात त्याला या भागातील घाणीचा ‘बुस्टर डोस’ मिळतो असेच म्हणाले लागेल. धाराशिवकरांच्या अन्नात रोज ‘विष’ कालवण्याचे काम या घाणीमुळे होत असुन याला जबाबदार कोण ? याचा जाब विचारण्याची वेळ या निवडणुकीच्या निमित्ताने आली आहे. अनेक वेळा उद्यान व आठवडी बाजार हे विषय सामाजिक न बनता राजकीय आरोप प्रत्यारोपाचे बनतात.
धाराशिव नगर परिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मंगळवारी मतदान होत आहे. धाराशिव शहरात दर रविवारी आठवडी बाजार भरतो, येणारा आठवडी बाजार हा 30 नोव्हेंबर रोजी भरणार आहे त्यामुळे मतदान करण्यापुर्वी वास्तव डोळ्यांनी पाहण्यासाठी धाराशिवकरांनी एकदा या बाजारात जाऊन तिथले चित्र पाहायला हवे. तिथे किती घाण, अस्वछता असते, भाजी पाल्यावर रस्त्याच्या धुळीसह किती घाण साचते व त्यावर पाणी मारून ती कशी विकली जाते हे आवर्जून पाहायला हवे.












