धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी रुपयांच्या निधीला देण्यात आलेली स्थगिती लवकरच उठवण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याशी चर्चा झाली असून निधी वाटपाचे पक्ष व लोकप्रतिनिधी निहाय सूत्र ठरले असून त्याप्रमाणे निधी वाटप होणार असल्याचे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले. माजी आमदार राहुल मोटे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली.
जिल्हा नियोजन समितीच्या निधीला स्थगिती दिली होती ती उठवली जाणार आहे. ती उठवली जात असताना महायुतीतील तिन्ही पक्ष, आमदार यांचा विचार केला जाईल, ठरलेल्या सुत्राप्रमाणे निधी वाटप केले जाईल. राष्ट्रवादीचा आमदार नसल्याने अन्याय होणार नाही. खूप मोठ्या रकमेचा निधी मिळेल असे होणार नाही मात्र काही तरी मदत कामे झाली पाहिजेत. दिलेला निधी हा जनतेच्या कल्याणासाठी वापरला जावा, चुका होणार नाहीत, केलेले काम दाखवता आले पाहिजे असे पवार म्हणाले.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी निधी वाटपावर आक्षेप घेत तक्रार केल्यानंतर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी पत्र दिले त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थगिती दिली. त्यानंतर पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री यांना पत्र देत स्थगिती उठवावी अशी विनंती केली त्या पत्रात त्यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर आरोप केले. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी माझ्याशी यासंदर्भात कोणताही संवाद साधलेला नाही, तसेच मी केलेल्या संपर्क प्रयत्नांनाही प्रतिसाद दिलेला नाही. सरकारची प्रतिमा मलीन होत असल्याचे सांगत स्थगिती उठवावी असे पत्र दिले, त्यावर कलगीतुरा रंगला.