धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाझी रहे यांच्या उरूस निमित्त निघालेल्या मिरवणुकीत डॉल्बी व लेझरचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात तब्ब्ल 30 पेक्षा अधिक डॉल्बी वाजल्याने अनेक भागातील नागरिक कर्णकर्कश आवाजाने हैराण झाले होते. पोलिसांना जवळपास 10 ते 15 डॉल्बी पकडण्यात यश आले असुन बाकीचे विना अडथळा पसार झाले. डॉल्बी प्रकरणात गुन्हा नोंद होऊन परिवहन विभाग (आरटीओ) दंड अशी दुहेरी कडक कारवाई होणार का ? हे पाहावे लागेल. ठोस कारवाई झाली तरच हे डॉल्बी चालक धाराशिवकडे फिरकणार नाहीत.
अनेक महापुरुषांच्या जयंती, धार्मिक उत्सव कार्यक्रमासाठी सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी पुरवलेल्या आर्थिक रसदीमुळे डॉल्बीचे पेव दिवसेंदिवस वाढत आहे. धाराशिव शहर डॉल्बीयुक्त होत असुन याचे ‘श्रेय’ सर्व नेत्यांना कमी जास्त प्रमाणात जाते. बेरजेचे राजकारण व व्होट बँक याच्या नादात चढाओढी व स्पर्धेतुन अश्या प्रकारांना ‘खतपाणी’ मिळत आहे. तरुणाईला जे जे मार्केटमध्ये चालते व लागते तेचं मागणीनुसार प्राधान्याने देतो. आम्ही रोख देणगी देतो पुढे ते ठरवतात, आमची चुकचं काय ? आम्ही तिकडे फिरकत पण नाही असे म्हणत जबाबदारी झटकतात. ‘मी नाही त्यातला’ अशी सार्वजनिक भुमिका घेणारे काही नेते डॉल्बीसाठी ‘रसद’ पुरवतात हे वास्तव व सत्य आहे. धाराशिव जिल्ह्यात सगळीकडे अशी स्तिथी आहे.
आगामी काही महिन्यात अनेक महापुरुषांच्या जयंती व उत्सव असल्याने तसेच निवडणुका असल्याने हे प्रमाण वाढणार असुन सुज्ञ मंडळीनी जाहीर ठोस भुमिका घेत पुढे येणे गरजेचे आहे. धाराशिवकरांची सहानशक्ती जास्त असल्याने ते नेहमीप्रमाणे यावर काही बोलणार नाहीत, आपल्या नशिबाला दोष देण्यात धन्यता मानतील यात तिळमात्र शंका नाही.
ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता व लहान मुले यांना जास्त त्रास होत असुन कर्णबधीरतेसह अन्य उपचार घ्यावे लागतात. मर्यादेपेक्षा जास्त आवाज कानासाठी धोकादायक असतो, वारंवार जास्त आवाजाने केवळ कान,लेझरने डोळे नव्हे तर हृदयावर परिणाम होतो. काही वेळा कायमचे कर्णबधीरत्व येत असल्याचे तज्ज्ञ डॉ सचिन देशमुख म्हणाले. जयंती काळात रुग्णाचे प्रमाण आवाजाच्या कारणाने वाढते तर काही तरुण हृदयविकार झटक्याने मेल्याची उदाहरणे आहेत मात्र त्यातुन बोध घेतला नाही.
एका डॉल्बीसाठी 1 लाख रुपयांच्या आसपास रक्कम जाते त्यात सामाजिक, लोकोपयोगी उपक्रम होऊ शकतात हा विचार फक्त तत्वज्ञान, भाषण व चर्चेपुरता राहिला आहे. त्यांनी केली मग आम्ही काही कमी आहोत का? अशी स्पर्धा लावली जाते. जल्लोष व उत्सव याची व्याख्या काळानुरूप बदलली असल्याचे जाणवते. आचार विचार ऐवजी धर्म जातीनुसार महापुरुषांची वाटणी झाली आहे. डॉल्बी व इतर प्रकारामुळे शिकवण व त्यांच्या व्यापक काम, जनजागृती मुठमती दिली जात आहे.
डॉल्बीबरोबर काही महापुरुषांच्या मिरवणुकीत तर चक्क महिलांना नाचविण्यात आले. अश्लील हावभाव व गाणी, नृत्य, मद्य, बेधुंद तरुणाई यामुळे कार्यक्रमाला गालबोट लागत आहे. कायद्याने डॉल्बीला बंदी असली तरी ‘डॉल्बीमुक्त’ धाराशिव शहर अश्या अभियानाची सुरुवात कोणत्या मुहूर्तावर करायची यावर राजकीय नेते व प्रशासन यांचे एकमत झालेले नाही. उलट पोलिस प्रशासनावर किरकोळ कारवाई करून सोडण्यासाठी दबाव टाकला जातो.
‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी स्तिथी असुन जागेवर कारवाई करावी तर भावनांचा उद्रेक व कायदा सुव्यवस्था बिघडेल यामुळे हात बांधले जातात त्यात राजकीय फोनाफोनीरुपी दबावाची भर पडते असेही काही अधिकारी खासगीत सांगतात. अनेक गावपुढारी डॉल्बी सोडवण्यासाठी ‘वजन’ वापरतात व कार्यकर्ते यांना खुश करतात. नियम मोडणाऱ्या मंडळाना पुढील वर्षी परवानगी देऊ नये अशी मागणी होत आहे.
कार्यक्रम, जयंती पुर्वी शांतता समितीच्या बैठका होतात मात्र भाषण व नेतेगिरीच्या पुढे काहीही पदरात पडत नाही, विचार मांडणाऱ्या व विरोध करणाऱ्याला मुर्खात काढण्याची परंपरा जोपासली जाते. आमच्याच वेळी बंदी का ? असे म्हणत विविध मुद्यावर विरोध करीत विषयांतर केले जाते. जिल्हाधिकारी व पोलिस प्रशासनाने ठोस आदर्शवत कारवाई करावी इतकीच अपेक्षा यानिमित्ताने व्यक्त होत आहे.











