शेतकरी,सामाजिक लाभार्थी आणि नागरिकांसाठी उपलब्ध होताहेत नवीन संधी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा प्रशासनाने शेतकरी, सामाजिक लाभार्थी व नागरिकांसाठी डिजिटलायझेशन,पारदर्शकता आणि सेवा-आधारित उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे.कृषी विकास,आपत्ती व्यवस्थापन, सामाजिक सुरक्षा व ई-ऑफिस यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजाचा वेग आणि गुणवत्ता दोन्ही वाढले असून,जिल्हा राज्यातील आदर्श प्रशासनाकडे वाटचाल करत आहे.
जिल्हा प्रशासनाने कृषी,महसूल, सामाजिक योजना,आपत्ती व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाधारित उपक्रमांद्वारे उल्लेखनीय प्रगती साधली आहे.गेल्या काही महिन्यांत राबविण्यात आलेल्या विविध योजनांचा आढावा घेतल्यास प्रशासनाचे कामकाज अधिक पारदर्शक,गतिमान आणि शेतकरी-केंद्रित होत असल्याचे स्पष्ट होते.
ई-पीक पाहणी आणि कृषी विकास – केंद्र शासनाच्या निर्देशानुसार खरीप २०२५ साठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल ऍप (व्हर्जन ४.०.०) शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी १ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२५ या कालावधीत स्वतः नोंदणी करून ई-पीक पाहणी करावी,तर १५ सप्टेंबर ते २९ ऑक्टोबर दरम्यान सहाय्यक स्तरावर ती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.वेळेत पाहणी केल्यास शेतकऱ्यांना कृषी पतपुरवठा,पीक विमा,दावे आणि नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई त्वरित मिळणार आहे.
शेतरस्त्यांच्या सुधारासाठीही जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू ठेवले असून आतापर्यंत ३४१ शेतरस्त्यांवरील अतिक्रमण हटवून २९० किलोमीटर रस्ते मोकळे करण्यात आले आहेत. याचा थेट लाभ ६ हजार ५०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार आहे.
नोंदणी आणि डिजिटल उपक्रम
राष्ट्रीय भूमी अधिनुकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-फेरफार प्रणालीद्वारे हरकत नसलेल्या २१ हजार १५० नोंदी केवळ २० दिवसांत,तर हरकत असलेल्या ३७९ नोंदी ६६ दिवसांत निर्गमित झाल्या आहेत.तसेच अँग्रीस्टॅक (AgriStack) प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक तयार करण्यात येत असून धाराशिव जिल्ह्यातील ४ लक्ष ७७ हजार ४४ शेतकऱ्यांपैकी ३ लक्ष ५० हजार २६८ शेतकऱ्यांनी नोंदणी २६ ऑगस्टपर्यंत केली आहे.एकूण खातेदारांच्या तुलनेत अँग्रीस्टॅक नोंदणी केलेल्या शेतकरी खातेदारांची टक्केवारी ७३.४४ टक्के इतकी आहे.
सामाजिक सुरक्षा व अनुदान वितरण
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजनेंतर्गत एकूण ९५ टक्के लाभार्थ्यांचे महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी पूर्ण झाली आहे.त्यांना ऑगस्ट २०२५ पर्यंतचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. सप्टेंबर २०२४ मधील अतिवृष्टीत बाधित १ लक्ष ५१ हजार ३०८ शेतकऱ्यांना १८७८४.६५ लक्ष रुपये वितरीत करण्यात आले आहे. एप्रिल-मे २०२५ आलेल्या अवेळी पावसामुळे बाधित ११ हजार २८० शेतकऱ्यांसाठी ९०१.८३ लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये आलेल्या अतिवृष्टीत बाधित ७९ हजार ८८० शेतकऱ्यांसाठी ८६४६.३३ लक्ष रुपये मंजूर झाले आहे.
ई-ऑफिस प्रणालीत धाराशिव अग्रगण्य –
जिल्ह्यातील सर्व महसूल कार्यालये आता ई-ऑफिस प्रणालीवर १०० टक्के कार्यरत असून,धाराशिव जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. यामुळे प्रशासनिक कामकाज जलद, पारदर्शक व लोकाभिमुख झाले आहे.
दहन व दफनभूमी सुविधा –
जिल्ह्यातील ३३० गावांमध्ये दहनशेड नसल्याचे लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीमार्फत २६ कोटी ४० लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला.त्यातून २६८ दहनशेड पूर्ण झाले आहेत.तसेच, जागा नसलेल्या ३६१ गावांपैकी २१० गावांना शासकीय जागा मिळाली असून,उर्वरित गावांमध्ये शेतकऱ्यांच्या संमतीने खाजगी जागा थेट खरेदी पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिबीर अभियान आणि नागरिक सेवा –
प्रत्येक महसूली मंडळात “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” राबविण्यात येत आहे.यात नागरिकांना राहिवासी,जाती,उत्पन्न दाखले,रेशनकार्ड,सामाजिक योजनांचे लाभ यांचे त्वरित वाटप करण्यात येत आहे.हे शिबिरे आता दर तीन महिन्यांनी आयोजित करण्यात येणार आहे.त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.
डिजिटल अॅप्समुळे प्रशासन अधिक गतिमान होण्यास मदत झाली आहे. जिल्हा प्रशासनाने १५० दिवसांच्या कृती आराखड्यातून विविध अॅप्स विकसित केली आहेत.यामध्ये कल्पवृक्ष अँप शासकीय निर्णय (जीआर) त्वरित उपलब्ध. तुळजाई धाराशिव हेल्पलाईन अँप नागरिकांना २४x७ मार्गदर्शन.कार्यसिद्धी अँप प्रकल्प ट्रॅकिंग व समन्वय. जीवनरेखा (जीवंत रस्ते) अँप शेतरस्त्यांवरील अतिक्रमण निवारण.
धाराशिव डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड अँप जल जीवन मिशन,प्रधानमंत्री आवास योजना, स्वच्छ भारत,मनरेगा आदी योजनांचे रिअल-टाईम डेटा व तुलनात्मक विश्लेषण करण्यात आले आहे. शेतकरी,सामाजिक लाभार्थी आणि नागरिकांसाठी डिजिटलायझेशन, पारदर्शकता आणि सेवा आधारित उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.जिल्हा प्रशासनाची या कामातून आदर्श प्रशासनाकडे वाटचाल सुरू आहे.त्यामुळे विविध योजनांचे लाभार्थी व नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.