ऐनं दिवाळीत नागरिक त्रस्त, नेत्यांचे कोरडे प्रेम – 140 कोटीसह अनेक कामे प्रलंबित, नेत्यांचा ‘सन्मान’ करून ‘आभार’ माना
धाराशिव – समय सारथी
रस्ते, कचरा कामासह अन्य ठेकदारीतील दलाली, राजकीय कुरघोडी व स्वार्थी राजकारणाने धाराशिव शहराची अक्षरशः वाट लावली असुन रस्त्यांचे हाल तर जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. रस्ते, कचरा, पाणी व रस्त्यावरील अंधार हे प्रश्न पाचवीला पुजले असुन रोजच्या अडचणीचे आहेत. ऐनं दिवाळीत रस्ते, वीज व कचरा अस्वछतेच्या समस्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नगर परिषद निवडणुका आल्याने काही जन वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांची जाणीव व चिंता असल्याचा दिखावा करीत आहेत.
मूलभूत समस्या सोडवण्यात अपयशी ठरलेले सर्वपक्षीय जबाबदार नेते, नगरसेवक यांचा जनतेने शाब्दिक ‘सन्मान’ करून मनमोकळेपणे ‘आभार’ मानायला हवे तरच हे विदारक चित्र सुधारेल. जनता व्यक्त व्हायला व जाब विचारायला विसरल्याने कदाचित हे घडत असावे. राजकारणी व अधिकारी हे ‘दलाली’ व आर्थिक गणित मांडण्यात मग्न आहे तर जनता आजाराने ‘दवाखान्याच्या’ चकरा मारत आहे. नेत्यांना दलालीरुपी लोण्याचा गोळा तर नागरिकांना औषधांचा ‘कडू’ डोस मिळत आहे.
शहरातील मुख्य चौक व ठीकठिकाणी कचऱ्याचे ढीग पडल्याने आजारांचे प्रमाण वाढले आहे. किमान कचऱ्याच्या कामात तरी ‘दलाली’ सोडा असे म्हण्याची वेळ आली आहे. शहरातील अनेक भागात पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य असुन दिवाळीच्या प्रकाशात रस्ता शोधावा लागत आहे. खड्डे, रस्ते याची दुरुस्ती अर्थात मलमपट्टी करण्यात जास्त आर्थिक फायदा मिळतो म्हणुन त्याला प्राधान्य दिले जाते, ते कसे कायम ‘नादुरुस्त’ राहतील याची पुरेपूर काळजी घेतली जाते.
स्वतःच्या अडचणी मांडण्यासाठी ‘शब्द’ फुटत नसल्याने तर काहीवर राजकीय दबाव तर मग आपण बोलून विरोध का घ्यायचा, दुश्मनी का पत्करायची? ज्याची अडचण आहे तो बोलेल की… आपल्याला काय करायचंय.. या ‘व्यापक’ मानसिकतेमुळे समस्यांचे सगळे ‘आभाळ’ फाटले आहे. हक्कासाठी ना मोर्चा, ना ओरड, ना जाब विचारणे.. त्यामुळे धाराशिवकरांच्या सहनशिलतेला ‘सलाम’ करायला हवा. काही प्रश्न विचारले की राजकारण.. राजकारण अशी आरोळी ठोकत विषयांतर हा जुना फ़ंडा वापरला जातो.
140 कोटीसह अनेक कामे प्रलंबित आहेत तर जिल्हा नियोजन समितीच्या कामात तक्रार करून खोडा घालून स्तिथी आणली, सत्ताधारी पक्षात सुरु असलेल्या कुरघोडीच्या राजकारणामुळे विकास कामांना ‘खो’ बसला आहे. कशी जिरवली? कसे अडवुन दाखवले? यात काही राजकीय नेत्यांना वेगळे ‘आत्मिक’ समाधान मिळत आहे, असेच दिसते. एकेकाळी एकत्र असलेले काही जने कमिशन खोरीच्या उजनी योजनेच्या पॅटर्नची यानिमित्ताने आठवण काढत आहेत.
डी सी अजमेरा हे ठेकेदार मानाचे असल्याने त्यांना काम मिळाले तरच शहराचा ‘सर्वांगीण’ विकास होऊ शकतो अशी काहीशी धारणा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची आहे. अजमेरा यांना काम मिळावे यासाठी ते जीवाचे रान करीत आहेत, त्यासाठी मुख्यमंत्री यांच्या दरबारी राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आहे. 140 कोटींचे काम निविदा दरापेक्षा 15 टक्के जादा दराने 162 कोटींना अजमेरा यांना मिळाले, त्यात 22 कोटी अतिरिक्त द्यावे लागणार होते मात्र ते वाचले हे उघड ‘सत्य’ आहे.
निविदा दराने म्हणजे 140 कोटीत काम करायला ठेकेदार अजमेरा तयार आहेत मात्र फेरनिविदा काढा असे उपमुख्यमंत्री यांच्या सुचना असल्याचे पालकमंत्री प्रतापराव सरनाईक म्हणाले. फेरनिविदा काढल्यास स्पर्धा होऊन आणखी काही कोटी वाचतील. 22 कोटी कोणाच्या घशात जाणार होते, त्याचा लाभार्थी कोण? आता 140 कोटीचे काम सुधारित दराने 160 ते 165 कोटींच्या आसपास जाणार आहे. त्यातही फायदा आहे मात्र दीड वर्ष जनतेचे हाल झाले.
अजमेरा ठेकेदारच का ? याचे समर्पक उत्तर आमदार राणाजगजीतसिंह पाटील देत नाहीत. पुन्हा निविदा काढली तर वेळ जाईल, कमी दराने निविदा जाईल याची खात्री कोण देणार अशी ‘गोंडस’ कारणे दिली जात आहेत. तसाही टेंडर वादात वेळ जातोय, हे मात्र नक्की.. सगळ्यांना सगळं कळतंय पण गळ्यात घंटी बांधणार कोण ? तेव्हा सत्तेत कोण होते? ही पळवाट असू शकते, त्या पेक्षा आता कोण आहे ते उत्तरदायी असतात, त्यांची जबाबदारी मोठी व निर्णायक असते.
धाराशिव शहरातील 59 डीपी रस्त्याचे काम गेली दीड वर्षांपासून झालेले नाही, 23 फेब्रुवारी 24 रोजी मान्यता मिळाली त्यानंतर 7 दिवसात निविदा काढणे व 3 महिन्यात कार्यादेश देऊन 91 दिवसात प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणे बंधनकारक होते. ही कामे 18 महिन्यात पुर्ण केली जाणार होती मात्र दीड वर्ष होत आले तरी टेंडर बाबत निर्णय झाला नाही. नशिबावर दोष देत खडे फोडत बसणाऱ्या नागरिकांची संख्या जास्त आहे.