धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेट जवळ लावण्यात आलेले शुभेच्छा बॅनर नगर परिषदेने काढल्याने राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालया जवळील बॅनर काढण्यात आले असले तरी शेजारील जिल्हा परिषद, पंचायत समिती, पोलिस मुख्यालय या भागात असलेल्या अनधिकृत बॅनर बाबत नगर परिषदेने कोणतीही कारवाई केली नाही.
शिवसेना आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देणारे बॅनर माजी जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी लावले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटजवळ लावण्यात आल्याचे कारण देत ते बॅनर सुरुवातीला नगर परिषदेने काढले त्यानंतर राजकीय वादाची कुणकुण लागताच शेजारील एक दोन बॅनर काढले गेले. सावंतानाच विरोध का ? सावंत यांच्या वाढदिवसाचे बॅनर खुपतात का ? अशी कुजबुज कारवाई वेळी होताच अर्चना पाटील यांच्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीचे 2 बॅनर काढुन बरोबरी करण्यात आल्याची चर्चा आहे.
स्वच्छ धाराशिव व सुंदर धाराशिव असा नारा नगर परिषद निवडणुकी वेळी व नेहमी गरजेचे नुसार दिला जातो मात्र धाराशिव शहरातील मुख्य चौक, रस्ते यांचे डिजिटल बॅनरबाजीमुळे विद्रुपीकरण होत आहे. सत्तेचा दुरुपयोग करून शहरात अनधिकृत बॅनर राजरोसपणे लावले जात आहेत, त्यात नगर परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, काही नगरसेवक, गाव पुढारी अग्रेसर आहेत.
धाराशिव शहराच्या प्रथम नागरिक म्हणुन गणल्या जाणाऱ्या नेहा काकडे व त्यांचे पती राहुल काकडे यांनी शहरातील मुख्य रस्त्यावर पोलच्या दोन्ही बाजुला बॅनर लावले आहेत तर उपाध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी सुद्धा जिल्हा परिषद, पोलिस मुख्यालय यासह शहरातील अन्य भागात शुभेच्छा देणारे बॅनर लावले आहेत. या मंडळीसह अन्य राजकीय नेते व गाव पुढाऱ्यांनी विविध शुभेच्छा देणारे लावले आहेत.
विशेष म्हणजे धाराशिव शहरातील अनेक बॅनरवर कोणताही क्यूआर कोड नाही, किंवा परवाना क्रमांक, मुदत यासह अन्य बाबी नमुद नाहीत. नगर परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष इतर सदस्यांना वेगळी वागणूक दिली जात असल्याचा आरोप या निमित्ताने होत आहे. मुख्य रस्त्याच्या मध्यभागी डिजिटल बॅनर लावणे कितपत योग्य हा चिंतनाचा विषय आहे.
धाराशिव नगर परिषद व जिल्हा परिषद या दोन्ही ठिकाणी भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीची सत्ता आहे, त्यांच्याच काही पदाधिकारी व कार्यकर्तेकडुन नियमांचा भंग होत आहे. विकासाचे वेगवेगळे मॉडल व संकल्पना मांडल्या जात असल्या तरी त्या प्रत्यक्षात येणे एक दिवा स्वप्न ठरतं आहे.












