धाराशिव – समय सारथी
“संकटाच्या काळात प्रशासन तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे,” असा विश्वास जिल्हाधिकारी श्री.कीर्ती किरण पुजार यांनी पूरग्रस्तांना दिला. परंडा तालुक्यातील पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः बाधित गावांना भेट देऊन परिस्थितीचा थेट आढावा घेतला व तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.
तातडीच्या मदतकार्याचा भाग म्हणून वडनेर गावातील 34 पूरग्रस्तांना प्रत्येकी 5 हजार रुपयांचे धनादेश वाटप केले.रुई येथील कुटुंबांना अन्नधान्य किटचे वितरण केले. वागेगव्हाण गावातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदतकार्याचा वेग वाढविण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. तसेच श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानकडून प्राप्त साड्यांचे वितरण पूरग्रस्त महिलांना वितरण केले.
या सर्व उपाययोजनांमुळे पूरग्रस्त नागरिकांना तात्काळ दिलासा मिळाला असून स्थानिक रहिवाशांनी जिल्हा प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. जिल्हाधिकारी पुजार यांनी स्पष्ट केले की, “नागरिकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही.प्रशासन प्रत्येक क्षणी तुमच्या सेवेत तत्पर आहे.”आपत्कालीन मदत हेल्पलाइन : ०२४७२-२२७३०१ /२२५६१८ यावर संपर्क साधावा.