धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गटात जागा वाटप व एबी फॉर्म भाजपकडे दिल्यावरून घमासान सुरु असतानाच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एबी फॉर्मवर चुकीची स्वाक्षरी असल्याचे समोर आले आहे. चुकीचे सहीमुळे पक्षाचा आज बाद होत, अपक्ष उभे राहण्याची नामुष्की आली आहे. सहीचा हा घोळ की राजकीय खेळी याचीच चर्चा आता रंगली आहे.
कधी पक्ष फोडायचा, कधी इतर पक्षातील जागेवर उमेदवार द्यायचा, कधी इतर पक्षाचे एबी फ्रॉम वाटायचे तर कधी सहीचा घोळ घालुन… अश्या सर्व प्रकारचे राजकारण धाराशिव जिल्ह्यात पहायला मिळत आहे. धाराशिव पंचायत समितीच्या 24 गणापैकी एकाही गणात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार रिंगणात नाही.
‘घड्याळ तेचं वेळ नवी’ असा नारा दिला गेला मात्र धाराशिवमध्ये घोळ झाला. राष्ट्रवादीला महायुती जागा वाटपात किती जागा मिळाल्या, हे गुलदस्त्यात ठेवले आहे. त्यातील किती जागा नेत्यांनी स्वतःसाठी कुटुंबासाठी किती घेतल्या व कशी तडजोड केली हे लवकरच समोर येणार आहे. आमच्या जागे पुरते बोला, कार्यकर्ते याचं बाजुला राहू द्या अशीच भुमिका दिसली.
एबी फॉर्मवर चुकीची स्वाक्षरी केली असल्याने पंचायत समितीच्या जागजी गणातील राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार धीरज घुटे यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागले आहे. जागजी येथे दत्ता सावंत शिवसेना उबाठा, प्रवीण सावंत भाजप, पांडुरंग सावंत शिवसेनासह 11 जण रिंगणात आहेत.
धीरज घुटे यांच्या ए फॉर्मवर आनंद परांजपे यांची सही आहे, बी फॉर्मवर शिवाजीराव गर्जे यांची सही आहे. या दोन्ही फॉर्मवर आनंद परांजपे यांची सही पाहिजे होती मात्र दोन्ही सह्या वेगवेगळ्या.. आणि इथेच घोळ झाला की घातला गेला.
धाराशिव तालुक्यातील बेंबळी गटातील उमेदवार व पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांनी व इतर ठिकाणी भरलेल्या एबी फॉर्मवर मात्र आनंद परांजपे यांची स्वाक्षरी असल्याने हा फॉर्म वैध ठरला मात्र इतर ठिकाणी सहीचा घोळ झाला की केला यावर आरोप प्रत्यारोप होत आहेत. आम्ही संधी दिली पण सहीचा घोळ झाला.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर जिल्हयाची स्वाक्षरी करण्याची जबाबदारी आनंद परांजपे यांच्याकडे असल्याचे नमूद करण्यात आले आहे, असे असतानाही बी फॉर्मवर शिवाजीराव गर्जे यांची सही होती, हे घडले कसे की घडवून आणले याची चर्चा होत आहे.











