धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आला असुन अनेक संकल्पना मांडून जनतेला आभासी विश्वात नेहून स्वप्ने दाखवली जात आहेत. पर्यटन विकासाच्या नावाखाली लाखो रुपये पाण्यात बुडवल्याचा एक प्रकारही यानिमित्ताने चर्चेला आला आहे. हातलादेवी पर्यटन विकासासाठी खानापूर तलावात 75 लाख रुपये खर्चून तरंगते कारंजे प्रकल्प साकारण्यात आला मात्र कारंजेचं चोरीला गेले. त्यामुळे कारंजे पाहण्याचा योग व लाभ धाराशिवकरांना मिळू शकला नाही.
सन 2017-2018 जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विविध ठिकाणी पर्यटन विकासासाठी मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी धाराशिव शहराशेजारील खानापुर तलावामध्ये तरंगते कारंजे बसवण्यासाठी 75 लाख रुपये जिल्हा नियोजन समिती निधीतून मंजुर करण्यात आले होते. जिल्हा परिषदेच्या मार्फत याची निविदा प्रक्रिया पार पाडून हे काम लातूर येथील विष्णूप्रेम इलेक्ट्रिकल्स या एजन्सीला देण्यात आले होते.
14 फेब्रुवारी 2019 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आल्यानंतर ‘वायूवेगा’ने या कंपनीने हे काम अवघ्या एक महिन्यात पुर्ण करून 14 मार्च 2019 ला हे तरंगते कारंजे धाराशिव जिल्हा परिषदेकडे हस्तातरित केले, त्याचे मूल्यांकन करून 75 लाख रुपये ठेकेदार यांना अदा करण्यात आले. यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.
22 डिसेंबर 2022 तत्कालीन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक व कार्यकारी अभियंता बांधकाम यांनी हातलाई तलावामधील तरंगते कारंज्याची संयुक्त पाहणी केली असता तेथे तरंगते कारंजे आढळून आले नाहीत. त्यानंतर तरंगते कारंजे शोधण्यासाठी शोध मोहीम राबवण्यासाठी 3 अधिकारी यांचे पथक नेमण्यात आले मात्र त्यांनाही तरंगते कारंजे सापडले नाही. या समितीने पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून आप्पती व्यवस्थापन कक्षाकडुन शोध घेण्यास विनंती केली. त्यानंतर 2 तरंगते कारंज्याचे ‘अवशेष’ मिळून आले परंतु साहित्य गायब होते.
हातलादेवी जवळील तलावातील तरंगते कारंज्याचे साहित्य, मोटारी, केबल, पंपाचे स्टार्टर असे 9 लाख रुपयांचे समान 23 मार्च 2019 ते 23 मे 2023 या दरम्यानच्या काळात चोरीला केल्याचा गुन्हा धाराशिव शहर पोलिस ठाण्यात 9 सप्टेंबर 2013 रोजी नोंद करण्यात आला आहे. जिल्हा परिषद यांत्रिकी विभागाचे उप अभियंता श्रीकृष्ण शिंदे यांनी याबाबत सरकारच्या वतीने फिर्याद दिली होती. अज्ञात चोर व साहित्य सापडले नाही.
कारंजे शोधण्यासाठी अथक मेहनत घ्यावी लागली. या कामातून कोणता पर्यटन विकास झाला हे अजून तरी समोर आले नाही. कारंजेमधुन उडालेले पाण्याचे रंगबेरंगी फवारे पाहिलेला नागरिक / साक्षीदार शोधूनही सापडत नाही. एकीकडे कारंजे सामान चोरीला गेल्याचा दावा केला जात असताना त्याच काळात जिल्हा परिषद प्रशासन वीज कनेक्शनसाठी पाठपुरावा करीत होते. हस्तातरण करून बिल अदा करण्यापुर्वी अनेक बाबी तपासल्या नाहीत, या कामात अनेक गौडबंगाल आहे.
तक्रार करा व विकास कामे आडवा हा छंद वेळोवेळी जोपासला जात असल्याने व राजकीय कुरघोडी करून एकमेकांची जिरवा या पॅटर्नमुळे जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्या उपरही काम झाले तर श्रेयवादाची लढाई कायम आहेच. धाराशिव शहरातील नागरिकांना वर्षानुवर्षे निवडणुका आल्या की तीच ती स्वप्ने दाखवली जातात. धाराशिव शहरातील प्रत्येक घरा घरावर सोलर पॅनल बसवून वीज निर्मिती उद्योगाची संकल्पना त्यापैकी एक ठरली.











