धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीचा आखाडा पेटला असुन आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. वरिष्ठ नेत्यांनी परस्पर शिवसेना भाजप युती केली असुन त्याला शिवसैनिकांचा विरोध आहे. धाराशिव, कळंब व तुळजापूर या 3 तालुक्यात शिवसेना पक्षात गोंधळाची स्तिथी आहे.
शिवसैनिकांचा होत असलेला कडाडून विरोध पाहता संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी सावध भुमिका घेतली असुन उमरगा येथे चौगुले यांच्या गढीत तळ ठोकून आहेत. साळवी व काही स्थानिक नेते बंगल्याच्या प्रेमात असुन सगळा मॅनेज कार्यक्रम आहे, लक्ष्मी दर्शन करून मुक्काम हलवला असल्याचा शिवसैनिकांचा आरोप आहे. पालकमंत्री यांना बोला माझी भुमिका ‘पोस्टमन’ ची आहे, निर्णय वरिष्ठाच्या हातात आहेत असे ते शिवसैनिकांना सांगत आहेत.
धाराशिव, कळंब या तालुक्यात सावंत यांची भुमिका निर्णायक ठरणार असुन तेरणा कारखाना व संपर्क माध्यमातून त्यांचे प्राबल्य आहे,पक्षाने वाऱ्यावर सोडलेल्या शिवसैनिकांना ते पाठबळ देऊ शकतात त्यामुळे ते किंगमेकरच्या भुमिकेत असणार आहेत. काही शिवसैनिक या 3 तालुक्यात पक्ष व अपक्ष असे 2 अर्ज भरण्याच्या तयारीत आहेत मात्र दुपारी 3 पर्यंत चित्र स्पष्ट होईल.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील व शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याशी मधुर संबंध असलेल्या व ‘गुड बुक’ मधील 3 शिवसेना उमेदवारांना एबी फॉर्म दिला असल्याची सूत्रांची माहिती आहे.आशीर्वाद मिळालेले ते ‘नशीबवान’ मानाचे शिलेदार कोण हे लवकरच स्पष्ट होणार आहे. तुळजापूर, कळंब व धाराशिव या 3 तालुक्यात 29 जागा असल्याने इथे भाजपला ‘सेफ झोन’ हवा असुन जास्तीत जास्त भाजप उमेदवार जागा पदरात पाडून विजयाचे गणित मांडायचे आहे.
भुम परंडा वाशी या 3 तालुक्यातील एबी फॉर्म आमदार सावंत यांच्याकडे तर धाराशिव, कळंब, तुळजापूर या 3 तालुक्याचे एबीफॉर्म संपर्कप्रमुख साळवी यांच्या ताब्यात आहेत. उमरगा लोहाराचे माजी आमदार चौगुले यांच्याकडे असुन ते तिथे भाजप की काँग्रेस सोबत जाणार असा निर्णय घेणार आहेत. एबी फॉर्मसह साळवी उमरग्यात तळ ठोकून आहेत, ‘शब्दप्रभु’ अशी ओळख असलेल्या माजी खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलून तिथे कोणता गोंधळ होतो का ? याकडे लक्ष लागले आहे.
भुम परंडा वाशी या 3 तालुक्यात 13, उमरगा व लोहारा या 2 तालुक्यात 13 अश्या 26 जागा आहेत तरी धाराशिव, तुळजापूर, कळंब या 3 तालुक्यात 29 जागा आहेत त्यामुळे हे 3 तालुके कोणाची सत्ता व अध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे ठरवणारे आहेत. या 3 तालुक्यात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे पक्षीय नेतृत्व आहे, त्यामुळे इथे अपेक्षित यश आले तर पक्षातील इतर नेत्यांच्या कुबड्यांची व मर्जीची गरज लागणार नाही असे बोलले जाते. अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांना ‘माऊली’ म्हणत अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर त्यांचा दावा ठोकला आहे.












