धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणारी धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्यात सकारात्मक बैठक होऊन काम वाटपाचे सूत्र ठरल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले असले तरी मागील आर्थिक वर्षातील निधीची स्थगिती उठवल्याचे अधिकृत पत्र वित्त विभागाने काढले नाही त्यामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रद्द करण्यात आली असल्याची सूत्रांची माहिती आहे.
स्थगिती उठवल्याचे पत्र दिवसभरात येणे अपेक्षित होते मात्र ते न आल्याने बैठक रद्द करावी लागली. बैठक रद्द झाल्याने मागील व चालु आर्थिक वर्षाचे नियोजन कोलमडणार आहे. 35-35-30 असे निधी वाटपाचे सूत्र ठरण्याची सूत्रांची माहिती आहे. निधी वाटपाचे सूत्र व गणित बदलण्याचा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा ‘हट्ट’ होता, तो ‘लाड’ नात्याने काका असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्ण केल्याचे कळते. ‘काका’ च्या खात्याने लेखी पत्र न काढण्याने बैठक रद्द करण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असुन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी याबाबतचे आदेश काढले होते. नवीन आर्थिक वर्ष सुरु होऊन 4 महिने झाले असून 2025-26 या चालू आर्थिक वर्षासाठी 457 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता मिळालेली आहे.
यापूर्वीच्या पालकमंत्री यांच्या काळात एकूण निधीच्या 15 टक्के प्रमाणे 30 टक्के कामे सत्ताधारी आमदारांना, 2 विरोधी पक्षाचे आमदार व खासदार यांना प्रत्येकी 10 टक्के असे 30 टक्के व शिल्लक 40 टक्के निधी हा पालकमंत्री यांना दिला जात होता, आता 35-35-30 असे ठरले आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या 268 कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली असुन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी याबाबतचे आदेश काढले होते. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी तक्रार केल्यानंतर ही स्थगिती देण्यात आली, त्यांनी नात्याने ‘काका’ असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तक्रार केली व स्थगिती द्यावी असे विनंती देणारे पत्र पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना द्यायला भाग पाडले, ही वस्तुस्तिथी आहे. सरनाईक यांनी मनधरणी करण्यास पुढाकार घेतला मात्र त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नसल्याचे सरनाईक यांनी मुख्यमंत्री यांना दिलेल्या लेखी पत्रात खंत व्यक्त करताना म्हण्टले आहे.