धाराशिव – समय सारथी
शेतात पाणी द्यायला गेलेल्या 16 वर्षाच्या मुलाला विजेचा शॉक लागून मृत्यू
धाराशिव तालुक्यातील बोरगाव राजे येथे शेतात पाणी देण्यासाठी गेलेल्या कृष्णा राम तावरे (वय १६) या युवकाचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
२५ एप्रिल रोजी रात्री १० वाजता वीज पुरवठा सुरू झाल्यानंतर कृष्णा आपल्या वडिलांसोबत शेतात पाणी देण्यासाठी गेला होता. यावेळी हवामानात थोडा पाऊस सुरू होता. लाईट आल्यावर कडबा कुट्टी मशीन अचानक सुरू झाल्याने त्यात जास्त करंट उतरला. मशीनकडून काही आवाज आल्याचे लक्षात आल्यावर कृष्णा तपासण्यासाठी गेला असता त्याच्या स्पर्शाने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला.
कृष्णाने धक्का बसल्यानंतर वडिलांना मदतीसाठी आवाज दिला. वडील धावत आले असता त्यांनाही थोडक्यात शॉक बसला. कृष्णाला तातडीने धाराशिव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.