धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील कालिका कला केंद्रवर दरोडा टाकण्यात आल्याची घटना घडली असुन यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. डोक्याला पिस्टल लावत धमकावत हल्ला करून 9 लाख 50 हजारांचा मुद्देमाल लुटण्यात आला असुन याप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात सचिन पवार, महादेव घुले व इतर 5 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करीत आहेत. कला केंद्र मालकीण निर्मला मोहन जाधव यांनी तक्रार दिली आहे.
मागील 9 ते 10 महिन्यापूर्वी तेरखेडा येथे राहणारे महादेव विठ्ठल घुले व तेरखेड़ा येथील लक्ष्मी पिडीवर राहणारा सचिन उर्फ प्रशांत बापु पवार हे अधून मधून माझ्या कलाकेंद्रावर एकत्रपणे यायचे त्यामुळे माझी व त्यांची ओळख झाली. महादेव घुले जेव्हा कलाकेंद्रावर यायचे त्यावेळी मला उसनने पैसे मागायचे. त्यावेळी मी त्याला काही वेळेस पैसे दिले व त्याने ते वेळेत परत देखील केले. परंतु त्यानंतर तो मी दिलेले उसने पैसे परत करण्यास उशीर करत असल्याने मी त्याला पैसे द्यायचे टाळू लागले. तुम्ही मला पैसे उसने द्या नाहीतर मी सचिन सोबत आल्यावर मला तुमच्या घराचे सर्व कानेकोपरे माहीत आहेत, तिजोरी कोठे आहे माहीत आहे. मी एके दिवशी सचिनला तुमचे घर फोडून चोरी करायला लाविन” असे मुस्करीने सारख म्हणायचा.
मागील 4 महिन्याखाली जिल्हाधिकारी यांनी चोराखळी येथील कालिका कला केंद्र जिल्ह्यातील इतर कला केंद्रासोबत बंद करण्याचा आदेश देऊन सील केले आहे. त्यामुळे मी जामगाव, बार्शी, जि. सोलापूर येथे राजलक्ष्मी कलाकेंद्र मी भाड्याने घेतले आहे. बार्शी येथील कलाकेंद्रावर मी रोज दुपारी जाते व पहाटे 3-4 वाजेच्या सुमारास माझ्या चोराखळी येथील घरी परत येते.
बार्शी तालुक्यातील नवीन सुरू केलेल्या कलाकेंद्रावर एकदा सचिन उर्फ प्रशांत बापू पवार हा तोंडाला बांधून आला होता. त्यावेळी मी पाहताच तो सचिन असल्याचे त्याच्या केसावरून ओळखले व त्याच्या तोंडाचा बांधलेला रुमाल माझ्या हाताने ओढून काढून त्याला “तू किती जरी तोंड झाकून आलास तरी मी तुला ओळखते” असे त्याला मस्करीने म्हणाले.
2 मार्चला नेहमीप्रमाणे बार्शी येथील कलाकेंद्र बंद करून पहाटे मी, माझी मैत्रीण रेखा शिंदे, शिवम उर्फ गब्या व माझ्या गाडीचा ड्रायवर शर्शिकात बाबुराव मुंडे इनोवा गाडीने चोराखळी येथे येत होतो. त्यावेळी मला येरमाळ्याच्या पुढे आल्यावर एका चारचाकी गाडीने पाठलाग केल्याचे जाणवले. त्यानंतर मी माझ्या चोराखळी येथील कलाकेंद्रावर पोहचले व दुसऱ्या मजल्यावर घरात गेले.
अचानक तोंडला अर्धवट कापड बांधलेले 6 इसम माझ्या घरात शिरले. त्यापैकी दोघांनी येऊन प्रथम गब्ब्याला डोक्याला खाली दाबून ठेवले व एकाने मला डोक्याला पिस्टल लावली व एकाने रेखाच्या गळ्याला सुरा लावला. त्यावेळी त्यांच्यापैकी एकजण माझ्यासमोर उभा होता त्याला मी ओळखले. तो सचिन उर्फ प्रशांत बापु पवार हाच होता. त्याच्या केसावरून व अर्धवट चेहऱ्यावरून मी त्याला ओळखले. परंतु ते आमच्या जीवाचे बरेवाईट करतील या भीतीने गप्प राहिले. आमच्या अंगावरील सोने घेऊन डोळ्यात चटणी टाकली.












