धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहराशेजारी असलेल्या हातलादेवी मंदीर परिसरातील कट्टा व फरशांची काही विकृत मानसिकता असलेल्या लोकांनी तोडफोड केल्याची घटना घडली असुन या परिसराचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. सकाळी व्यायाम करण्यासाठी गेल्यावर काही निसर्गप्रेमीच्या ही गोष्ट लक्षात आली, त्यानंतर संताप व्यक्त होत असुन कारवाईची मागणी होत आहे. हातलादेवी हे शहराजवळील एक पर्यटन व निसर्गरम्य ठिकाणापैकी एक असुन इथे लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिक नियमित फिरायला जातात. रात्रीच्या सुमारास काही तरुण या ठिकाणी टवाळखोरी व मद्यधुंद होऊन गोंधळ घालत असल्याचे प्रकार सध्या वाढले आहेत. काही विकृतांनी चक्क कट्टा व फरशी तोडून या परिसराचे विद्रुपीकरण केले आहे. फरशी व कट्टा दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. हातलादेवी परिसरात पोलिस विभागाचे वायरलेसचे टॉवर आहे.वन विभागाने या ठिकाणी गस्त वाढवने व सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे.