लोहारा/उमरगा – समय सारथी
खरीप हंगाम 2024 मधील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तब्बल 86 कोटी 46 लाख रुपयांचे अनुदान मिळवून देणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये सत्कार करण्यात आला.
सुरुवातीला जिल्हा प्रशासनाने 8 ऑक्टोबर रोजी कळंब, धाराशिव व वाशी या तालुक्यांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. मात्र, लोहारा व उमरगा यांची नावे त्यातून वगळण्यात आली. ही बाब तत्काळीन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या निदर्शनास आणून देत, अनिल जगताप यांनी लोहारा व उमरगा तालुक्यांचा समावेश करण्याची मागणी केली.
त्यांच्या पाठपुराव्यामुळे लोहारा व उमरगा महसूल व कृषी विभागाने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. यानंतर जिल्हा प्रशासनाने 79,880 शेतकऱ्यांसाठी 86 कोटी 46 लाखांचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला, जो 28 ऑक्टोबर रोजी मंत्रालयात पोहोचवण्यात आला.
परंतु, सरकारकडून वेळोवेळी निघणाऱ्या निर्णयांमध्ये लोहारा-उमरगाचा समावेश होत नव्हता. अखेर 30 एप्रिल रोजी अनिल जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रवीण स्वामी, सक्षणा सलगर, अजिंक्य पाटील, अमोल बिराजदार यांच्यासह लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान, उपायुक्त कार्यालयातील प्रस्ताव मदत व पुनर्वसन सचिव कैलास गायकवाड यांच्याकडे थेट सुपूर्द करण्यात आला.
तरीही शासन निर्णय होत नव्हता. म्हणून श्री. जगताप यांनी नारंगवाडी येथे रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला. यानंतर सरकारला जाग आली आणि 29 जुलै 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. त्यानुसार, लोहारा तालुक्यातील 30,652 शेतकऱ्यांना 33.70 कोटी रुपये तर उमरग्यातील 49,682 शेतकऱ्यांना 52.75 कोटी रुपये मंजूर झाले.
या सर्व लढ्याचे श्रेय सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांच्या अथक प्रयत्नांना जाते, हे लक्षात घेऊन उंडरगाव, रेबे, चिंचोली, हराळी, नागूर, कास्ती बुद्रुक आदी गावांमध्ये त्यांचा शेतकरी बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शासनात कोणतेही पद नसताना केवळ सामाजिक बांधिलकीतून लढा देऊन एवढी मोठी रक्कम मिळवून देणारे अनिल जगताप हे शेतकऱ्यांच्या नजरेत खरे हिरो ठरले आहेत.