धाराशिव – समय सारथी
तुळजाई कला केंद्र विरोधात आवाज उठवल्याच्या रागातून स्वाती जोगदंड या महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन विनयभंग केल्या प्रकरणी 4 जणांवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कायदा व नियमांचा भंग केल्याप्रकरणी तुळजाई कला केंद्राचा परवाना जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कायम स्वरूपी रद्द केला होता. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी आदेश दिल्यावर जिल्हाधिकारी यांनी कारवाई केली होती.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमसाला या गावचे उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेली नर्तिका पुजा गायकवाड ही वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील याचं तुळजाई कला केंद्रावर होती, आत्महत्या पुर्वी बर्गे तीला भेटायला तिथे आले होते त्यानंतर पुजाच्या घरी आईकडे सोलापूर जिल्ह्यातील वैराग जवळील सासुरे येथे जाऊन डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली होती. तुळजाई कला केंद्र यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले होते.
भारतीय न्याय संहिताचे कलम 74, 351(2), 351(3) व 3(5) प्रमाणे वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. स्वाती जोगदंड यांच्या फिर्यादीवरून निलेश जोगदंड, सुशांत उंदरे,धनंजय मोटे व गणेश मोटे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तुम्ही तुळजाई केंद्राचा मुद्दा हाती का घेतला ? तुळजाई कलाकेंद्र हे माझ्या रानात आहे. तुळजाई कला केंद्राबद्दल बोलू नका. दुसरे गोष्टीबद्दल बोला माझी काही हरकत नाही, तुळजाई कला केंद्राने तुमचे काय वाटोळे केले आहे. तुम्हाला त्याचे काय करायचे आहे ते करा असे म्हणुन आरोपीनी धमकी दिली. काही आरोपीनी गैरकृत्य करून विनयभंग केला तसेच कुटुंबातील सदस्यांना धमकी दिली, अशी तक्रार केली.
तुळजाई कला केंद्राच्या मालकाकडून आमच्या घराजवळ किंवा शेताकडे ड्रग्ज, गांजा ठेवण्याच्या धमक्या येत असुन असे काही घडल्यास तुळजाई कला केंद्राचे मालक व संबंधीत लोक जबाबदार राहतील, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी असे दाखल गुन्ह्यात नमुद आहे.
तुळजाई कला केंद्रावर झालेल्या हाणामारीच्या घटना व गुन्हे, पुजा गायकवाड हिचा व आत्महत्या प्रकरणाचा संदर्भ, दारू विक्री, रात्री उशिरा सुरु असणे, डीजेचा सर्रास वापर, स्थानिक महिला व ग्रामस्थाचा विरोध, विविध संघटना यांच्या तक्रारी, कला केंद्रात महिला नर्तकी यांची झालेली छेडछाड व त्या असुरक्षित असणे यासह अन्य कारणे व कागदपत्रांची जंत्री अहवालासोबत जमा केली होती त्या आधारे परवाना जिल्हाधिकारी यांनी कायमस्वरूपी रद्द केला आहे.