धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की माफिया विरोधात पोलिस अधीक्षक संजय जाधव यांच्या आदेशाने कारवाईला सुरुवात झाली असुन शेतकऱ्याला मारहाण प्रकरणी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये 10 जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पवनचक्कीच्या ठेकेदार व गुंडाकडून शेतकऱ्यांना मारहानीचा प्रकार घडला होता. गुन्हा दाखल करुन याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे हे तपास करीत आहेत.
तुळजापूर तालुक्याच्या बारुळ गावामध्ये सचिन ठोंबरे या शेतकऱ्याला पवनचक्कीच्या गुत्तेदार आणि गुंडाकडून बेदम मारहाण करण्यात आली होती.मारहाण करणारे आरोपी दादा पवार, अंकित मिश्रा, वैभव कदम व इतर सात जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्याची वीस गुंठे जमीन घेऊन 35 गुंठ्या वरती पवनचक्की कंपनीकडून कब्जा करण्यात आला होता. तुळजापूर तालुक्यासह भुम, वाशी, परंडा या भागात पवनचक्की माफिया बोकाळला असुन मुंबई पुणे येथील 3-4 गँग सक्रीय आहेत. बाउन्सर, काळ्या गाड्या, बंदुकबाजी असे दहशतीचे प्रकार वाढले आहेत. पवनचक्की माफियाच्या दबंगगिरी विरोधात विशाल रोचकरी यांनी आवाज उठवला असुन शेतकऱ्यांना भेटून आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी धीर देत दिलासा दिला आहे.
कलम 118(1),191(2),191(3),190,352,351(2),(3)भारतीय न्याय संहिता 2023 नुसार फिर्यादी सचिन प्रभाकर ठोंबरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जेएसडब्लू पवनचक्की कंपनी तील काही जण यात आरोपी असुन फिर्यादीचे आईने जे एस डब्लू कंपनीला पवनचक्कीसाठी गट न 81 मधील 20 गुंठे जमीन भाडेतत्वावर दिलेली आहे. पवनचक्कीचे लोक 20 गुंठे जमीन न वापरता 30 ते 35 गुंठे जमिनीवर अतिक्रमण केले. फिर्यादीचे शेतातील लिंबाचे,बाभळीचे,बोराचे झाडे हे आरोपितानी कुठलीही परवानगी न घेता तोडत असताना झाडे तोडू नका अशी विनंती केली तरी डोक्यात रॉड घालून जखमी करीत शिवीगाळी करून जीवे मारण्याची धमकी दिली.