धाराशिव – समय सारथी
बनावट अकृषी आदेश तयार करुन प्लॉट विक्री करुन प्लॉटधारक व शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात मुनाफ सौदागर व संतोष भालचंद्र मोरे यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या दोघांनी संगणमत करुन बनावट अकृषी आदेश तयार करुन प्लॉट विक्री प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा नोंद केला आहे. बनावट अकृषी आदेश बनविल्याचे उघड झाल्यावर दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपीक मोहन कुलकर्णी यांनी तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद झाला असुन यानिमित्ताने परंडा शहरात बोगस रॅकेट व भुमाफिया सक्रीय असल्याचे समोर आले आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयातील कुलकर्णी हे कार्यालयीन काम करीत असताना मुनाफ सौदागर व संतोष मोरे यांनी कट रचून 2 जानेवारी 2012 ते 1 फेब्रुवारी 2022 दरम्यान परंडा शहरातील सर्वे नंबर 26/2/ब याचे बनावट अकृषी आदेश तयार करुन संबंधित प्लॉटधारक जरिचंद साहेबराव गोडगे व शासनाची फसवणूक केली तसेच दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीसाठी सादर केला पोलीस निरीक्षक इज्जपवार यांच्या आदेशाने कलम 420, 467,468,471,120 ब इतर कलमानव्ये गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सपोनी सुर्वे हे करीत आहेत.
या दोघांनी यापुर्वी असे प्रकार केले आहेत का व किती जणांची फसवणूक केली याचा तपास पोलीस करीत आहेत. जानेवारी महिन्यात या प्रकरणात गुन्हा नोंद झाला होता मात्र आरोपी फरार होते व त्या काळात त्यांनी जामीनसाठी प्रयत्न केले मात्र ते अपयशी ठरले, अखेर आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.