धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात पुणे येथील माफिया व गुंडाच्या टोळ्यांचा हस्तक्षेप वाढला असुन पवनचक्की कामे, हाणामारी, खंडणी व इतर माध्यमातून अवैध प्रकार, बंदुकबाजी असे प्रकार सर्रास होताना दिसत आहेत. माफिया निलेश घायवळ याच्या विरोधात धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे त्यानंतर अज्ञात आरोपी विरोधात वाशी पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम 351(2) व 351(3) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्याचा तपास हे करीत आहेत. पहिल्यांदा गुंड निलेश घायवळ धाराशिव पोलिसांच्या रेकॉर्डवर आला आहे. मूळ तक्रार व दाखल गुन्हा यात अनेक बदल राजकीय दबावापोटी केल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर बिक्कड यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे. अदखलपात्र गुन्हा नोंद असला तरी अवैध शस्त्र व इतर बाबीचा तपास झाल्यास कलम वाढ होऊ शकते.
धाराशिव जिल्ह्यातील परंडा, वाशी, भुम, तुळजापूर तालुक्यातील काही भागात पुणे येथील माफियाच्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. पवनचक्की प्रकरणात अनेक ठिकाणी शेतकरी यांची आर्थिक पिळवणूक होत असुन दलाल व टोळ्यांचा सुळसुळाट झाला आहे त्यातील वर्चस्वतुन मारहाणीचे प्रकार होत आहेत. तुळजापूर व परंडा या भागात एमडी ड्रग्जने देखील शिरकाव केला असुन गुन्हा नोंद झाला मात्र पेडलर व मास्टर माईंड पर्यंत पोहचता आले नाही.
वाशी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवक प्रदेश उपाध्यक्ष नितीन बिक्कड यांचे वडील अंकुश बिक्कड यांनी घायवळ याच्यापासुन मुलाच्या जीविताला धोका असल्याची तक्रार वाशी पोलिस ठाण्यात दिली आहे. निलेश घायवळ हा त्याच्या साथीदारसोबत 3 गाड्यातून आला व नितीन बिक्कड कुठे आहे, त्याला माज आला आहे त्याला सोडणार नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली त्यांच्याजवळ त्यावेळी बंदुका होत्या असे लेखी तक्रारी नमूद केले आहे.
निलेश घायवळ हा पुण्यातल्या सराईत गुन्हेगारांपैकी एक गुन्हेगार आहे. निलेश घायवळ हा एक गुन्हेगारांचा टोळी प्रमुख असून त्याच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. “बॉस” या नावाने घायवळ पुण्यात ओळखला जातो. 2002 ते 2003 या काळात गुन्हेगारी विश्वात नाव गाजवले. कुख्यात गुन्हेगार निलेश बन्सीलाल घायवळ हा मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथील आहे. शिक्षण घेण्यासाठी तो पुण्यामध्ये आला होता आणि मास्टर इन कॉमर्सची डिग्रीपर्यंत शिक्षणही पूर्ण केले त्यानंतर त्याची भेट गजानन मारणेसोबत झाली. गजानन मारणेसोबत या दोघांनी एका गुन्हेगाराचा खून केला होता त्यानंतर त्यांनी ७ वर्षाची शिक्षाही भोगली होती. जेलमधुन बाहेर पडल्यानंतर दोघांमध्ये आर्थिक आणि वर्चस्वाच्या व्यवहाराने वाद झाला. यामध्ये घायवळ टोळीतील गुंड पप्पू गावडे खून मारणे टोळीने केला होता तर त्याच्या बदला म्हणून घायवळ टोळीने सचिन कुंडलेचा खून केला. हा रक्तरंजक थरार पुढे आणखीनही वाढत गेला आणि असेच एकमेकांच्या सहकाऱ्यांचे गँगवॉरमधुन खून होत गेले.