धाराशिव – समय सारथी
अवैधरित्या गर्भपात केल्याप्रकरणी भुम पोलिसांनी एका डॉक्टरविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना चिंचपूर ढगे येथे उघडकीस आली आहे.
डॉ. नंदकुमार रामलिंगप्पा स्वामी (वय 57, रा. चिंचपूर ढगे, ह.मु. दत्तनगर, बार्शी, जि. सोलापूर) यांनी दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 7.30 ते 13 ऑक्टोबर सकाळी 8.30 या वेळेत आपल्या शेतात फिर्यादी सविता संतोष बनसोडे (वय 25, रा. विजोरा, ता. वाशी, जि. धाराशिव) यांना गाडीत झोपवून गाडीत असलेल्या मशिनने तपासणी केली. त्या वेळी फिर्यादी या पाच महिन्यांच्या गर्भवती होत्या. तरीही आरोपी डॉक्टरांनी त्यांना काही गोळ्या सेवनास दिल्या, ज्यामुळे त्यांचे पोट दुखू लागले आणि गर्भपात झाला.
गर्भपात झाल्यानंतर फिर्यादीच्या पतीने अर्भक डॉक्टरांच्या शेतात पुरले, मात्र हे का केले असा प्रश्न उपस्थित होताच फिर्यादीवर मारहाण झाल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी सविता बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुम पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टरविरुद्ध भा.दं.सं. कलम 89, 238 तसेच 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास भुम पोलिसांकडून सुरू आहे.