धाराशिव – समय सारथी
नैतिकतेचे धडे देणाऱ्या एका मौलवीविरोधात धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. भर गर्दीच्या नळदुर्ग बसस्थानकात महिला आणि शाळकरी मुलींसमोर मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ लावून अश्लील हावभाव केल्याच्या हा प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यानंतर सुनील माणिकराव गव्हाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारवाई केली.
नळदुर्ग बसस्थानकात फिर्यादी हे बसची वाट पाहत असताना, तिथेच बसलेला आरोपी कासीम अब्दुल रहीम इनामदार (रा. रहीमनगर, नळदुर्ग) याने सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या महिला, मुली आणि इतर नागरिकांना दिसेल अशा पद्धतीने मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ सुरू केला. एवढ्यावरच न थांबता, तो सर्वांसमोर अश्लील हावभाव करू लागला. त्याचा हा विकृत प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेल्या शाळकरी मुली आणि महिला प्रचंड घाबरल्या व लज्जेने मान खाली घालून तिथून उठून दूर गेल्या मात्र त्याने व्हिडिओ पाहणे सुरूच ठेवले.
आरोपी कासीम इनामदार विरोधात भारतीय न्याय संहिता, 2023 च्या कलम 294(1), 294(2) व 296 अन्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल उमाजी पांडुरंग गायकवाड करत आहेत.