धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका आईने अवघ्या 1 वर्षाच्या चिमुकल्याला केवळ 10 हजार रुपयांत सोलापूर येथील कुटुंबाला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुरूम पोलिसात आई करुणा अमोल तळभंडारे, यशोधरा उर्फ पिंकी दिनेश गायकवाड, उज्ज्वला बाळु कांबळे, बाळु कांबळे, सुधीर ढेपे, लक्ष्मी गायकवाड, गोकुळ चौधरी या 7 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
संबंधित महिलेने पहिल्या पतीपासून विभक्त होऊन दुसऱ्या पतीसोबत राहण्यासाठी अडथळा ठरत असल्यामुळे आपल्या मुलाची विक्री केली. या विक्रीसाठी तिने स्वतः बॉण्डवर संमती दिली असून, सोलापूर येथील कांबळे कुटुंबाला हे मूल दिले.मुलगा व सून हरवल्याची तक्रार पीडित मुलाच्या आजीने मुरूम पोलिसात दिल्यानंतर प्रकरणाचा पर्दाफाश झाला. 100 रुपयांच्या बॉण्डवर बेकायदेशीर दत्तक विधानाचा करारनामाही करण्यात आला होता.
सामाजिक कार्यकर्त्यांनी आजीच्या मदतीने मुलगा ताब्यात घेतला व त्याला बाल कल्याण समितीकडे सुपूर्द करण्यात आले. ताप व जुलाब यामुळे मुलाची प्रकृती खालावल्यामुळे समितीच्या आदेशानुसार सध्या धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सत्यभामा सौदरमल, दीपाली भोसले, युवराज डावरे व त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पीडित मुलाच्या आईवर आणि तिच्या दुसऱ्या नवऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.