धाराशिव – समय सारथी
मुलीच्या छेडछाड प्रकरणी आरोपी महेश महादेव कदम यास 4 वर्षे 1 महिना व 2 हजार 500 रूपये दंडाची शिक्षा कळंब जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी सुनावली आहे. या प्रकरणी सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी सक्षमपणे बाजू मांडली.
गुन्ह्याची थोडक्यात हकीगत अशी की, कळंब तालुक्यातील एका गावात 25 एप्रिल 2023 रोजी शाळेला सुट्टी असल्याने पिडिता ही घरी होती. त्यादिवशी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पिडितेच्या आईने प्रमोद पवार यांच्या किराणा दुकानातून साखर आणण्यासाठी पाठविल्याने पिडिता साखर घेवून घरी परत येत असताना लोमटे यांच्या घरासमोर त्यांच्या घरात राहणारा आरोपी महेश महादेव कदम याने पिडितीस रस्त्यामध्ये अडविले व पिडितेचा हात पकडून म्हणाला की, तु मला आवडतेस, तु माझ्या सोबत बोल, तेव्हा पिडितेने त्यास विरोध करून तु मला बोलू नकोस, मी माझ्या आई-वडिलांना तुझे नाव सांगेन. तेव्हा आरोपी महेशने पिडितेस धमकी दिली की तु कोणाला काही सांगितलेस तर तुला, तुझ्या आई-वडिलांना व भावाला मारेन. तेव्हा पिडिता घाबरून घरी निघून गेली.
या घटनेपूर्वीही मागील एक महिन्यापासून आरोपी हा पिडिता शाळेमध्ये जाता-येताना पिडितेच्या पाठीमागे फिरत असे व पिडितेकडे पाहून तिला त्रास देत असे. हा सर्व प्रकार तिच्या आई-वडिलांना पिडितेने सांगितल्यानंतर आरोपीस जाब विचारण्यासाठी गेलेल्या आई-वडिलांना मारहाण केली. त्यावरून शिराढोण पोलिस स्टेशन येथे आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचा तपास सपोनि नेहरकर व पुजारवाढ यांनी केला. व दोषारोपत्र कळंब जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल केले.
सदरील प्रकरणामध्ये सरकारपक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पिडितेची साक्ष व इतर साक्षीदारांचे साक्षी पुरावे महत्वपूर्ण ठरले. या प्रकरणी कळंब जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी आरोपीस 4 वर्षे 1 महिना व 2 हजार 500 रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. अशिष कुलकर्णी यांनी बाजू मांडली.











