धाराशिव – समय सारथी
पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस 10 वर्षे सक्तमजुरी व 55 हजार दंडाची शिक्षा धाराशिव कोर्टाने सुनावली आहे. धाराशिव तालुक्यातील कोंड येथे नरसिंग गोरोबा चव्हाण याने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन लोखंडी विळ्याने मारहाण केली यात पीडितेच्या डोक्यात, चेहऱ्यावर गंभीर दुखापत होत डावा हात फ्रॅक्चर झाला होता. या प्रकरणात 11 साक्षीदार तपासण्यात आले, न्यायाधीश राजेश गुप्ता यांनी आरोपीला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सुर्यवंशी यांनी बाजु मांडली.
प्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, 1 सप्टेंबर 2021 रोजी आरोपी नरसिंग गोरोबा चव्हाण हा त्याच्या पत्नीसह कोंड शिवारातील त्यांच्या घरच्या शेतात उडीद – मुग काढण्यासाठी गेले असता दुपारी 4 च्या सुमारास आरोपीने त्याच्या पत्नीसोबत तिच्या चारित्रयावर संशय घेवून भांडण केले व पत्नीला जीवे मारण्याचे उद्देशाने त्याच्या हातातील काठीने डोक्यात मारले. लोखंडी विळयाने डोक्यात, तोंडावर, नाकावर, डोळयाजवळ जबर मारहाण केली. सदर मारहाणीमुळे जखमीच्या डोक्यात व चेह-यावर गंभीर जखमा झाल्या व दातही पाडले होते. डावा हातही फॅक्चर केला होता. सदरील गंभीर जखमा असतानाही पती आरोपी तेथून पळून गेला. त्या दरम्यान शेता शेजारील शेतकरी त्या ठिकाणी जमा झाले त्यानंतर आरोपीचा मुलगा व इतर शेतक-यांनी जखमीस सुरुवातीस मुरूड येथील सरकारी दवाखाना व त्यानंतर लातूर येथील सहयाद्री हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
मुलाने वडिलाविरोधात तक्रार केली त्यानंतर ढोकी पोलीस स्टेशन येथे कलम 307,326,323 नुसार गुन्हा नोंद झाला. सदर गुन्हयाचा तपास सुरेश बनसोडे, सहा. पोलीस निरिक्षक व जगदिश राऊत, सहा. पोलीस निरिक्षक यांनी करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सदर प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायाधिश आर एस गुप्ता यांचे न्यायालयात पुर्ण झाली. सदर प्रकरणात कोर्ट पैरवी म्हणुन ढोकी येथील महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल एस.व्ही. दसवंत व पोलीस कॉन्स्टेबल एस.एन. शेळके यांनी काम पाहिले.