धाराशिव – समय सारथी
एका फिर्यादीला खोट्या गुन्ह्यात अडकवल्या प्रकरणी वादग्रस्त पोलिस उपनिरीक्षक गणेश झिंझुर्डे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रमुख न्यायाधीश अंजु शेंडे यांनी दिले आहेत. तुळजापूर येथील अभिजीत राजाभाऊ माने यांच्यावर शासकीय कामात अडथळा केल्याच्या गुन्हा तुळजापूर पोलिसात नोंद करण्यात आला होता त्या प्रकरणात न्यायाधीश शेंडे यांनी माने याची निर्दोष मुक्तता करीत झिंझुर्डे यांच्यावर कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक यांना दिले आहेत.
झिंझुर्डे यांच्या बाबतीत कोर्टाने अनेक गंभीर निरीक्षणे नोंदविली असुन झिंझुर्डे यांचा नळदुर्ग गांजा तस्करी प्रकरणात सहभागी असल्याने त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात झाला असुन त्यांना निलंबित करण्यात आले आहे. वाशी येथे बदली झालेली असताना त्यांनी नळदुर्ग येथे गांजा तस्करी केली माने यांच्या घटनेत त्यांनी खोटा गुन्हा नोंद केल्याने गैरवर्तन बाबत कारवाईचे आदेश पोलिस अधीक्षक यांना दिले आहेत. माने यांच्या वतीने ऍड युवराज खैरे यांनी बाजु मांडली.
तुळजापूर पोलीस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक गणेश झिंजुर्डे याने स्वतः फिर्यादी होऊन कलम 353,332,506 नुसार 24 मार्च 2020 रोजी अभिजीत राजाभाऊ माने यांच्यावर गुन्हा नोंद केला होता. नोंद केलेल्या फिर्यादीनुसार झिंझुर्डे हे कोरोना काळात पेट्रोलिंग करीत असताना माने यांना अडविले त्यावेळी त्यांनी मास्क न घालता पोलिसांची गच्ची धरून मारहाण व हुज्जत घातली.या प्रकरणाची सुनावणी झाल्यावर पोलिसांनी केलेल्या अनेक नियमबाह्य बाबी समोर आल्या. पोलिस कोठडीत असताना माने ह्यांना मारहाण केली ही बाब वैद्यकीय तपासणी अहवालात स्पष्ट झाली.
महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने मुंबई यांनी 3 नोव्हेंबर 2023 रोजी धाराशिव पोलीस अधीक्षक यांना नोटीस देऊन झिंजुर्डे याच्यावर कोणती कारवाई करणार आहात त्याबाबत 27 डिसेंबरपर्यंत कळविण्याचे आदेश दिलेले आहेत. झिंझुर्डे यांना आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले असुन ते सध्या गडचिरोली येथे काम करीत आहेत.
प्रमुख न्यायाधीश शेंडे यांनी अनेक महत्वाचे निकाल दिले असुन त्यांची भूमिका महत्वाची ठरली आहे. एका खुनाच्या प्रकरणात आरोपीला नियमबाह्य जामीन देताना त्यांनी वेळीच जामीन नाकारला, त्याच्या या भूमिकेचे उच्च न्यायालयाने कौतुक केले. त्यासह अन्य बाबीमुळे तत्कालीन जिल्हा व सत्र न्यायाधीश गोपाळ अग्रवाल यांचे निलंबित करण्यात आले शिवाय प्रशासकीय चौकशी सुरु आहे. माने प्रकरणात आता त्यांनी पोलिस उपनिरीक्षकाला कारवाईचा दणका दिला आहे.