धाराशिव – समय सारथी
लातूर येथील एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकारी हत्या प्रकरणाचा निकाल समोर आला असुन दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर इतर चार आरोपींना तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. लातूर येथे हत्या करुन मृतदेह तुळजापूर जवळील पाचुंदा तलावात सापडला होता.
हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी सहा लोकांना अटक केली होती. याप्रकरणी गेल्या नऊ वर्षांपासून एक आरोपी जेलमध्ये आहे, तर इतर सहा जण जामीनावर बाहेर आहेत. स्थानिक पोलीस ते सीबीआय अशा पाच तपास यंत्रणांनी या प्रकरणी तपास पूर्ण केला असून याप्रकरणी जवळपास हजार पानांचे दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते.
विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी याबाबत आवाज उठवल्या नंतर यां प्रकरणात गती आली होती. त्यांनी अनेक वेळा हा विषय लावून धरला.
21 मार्च 2014 रोजी महिला बेपत्ता झाली. 24 मार्चला मृतदेह धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरजवळ पाचुंदा तलावात सापडला. 24 तारखेलाच रात्री उशिरा मृतदेह लातुरात आणण्यात आला आणि लगेचंच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 26 मार्च रोजी महिलेच्या भावाने बलात्कार करून खून करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.
28 मार्च 2014 या तारखेला संध्याकाळी पोलिसांनी हत्येप्रकरणी युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना अटक केली. 13 एप्रिल रोजी या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी श्रीरंग ठाकूर याला पोलिसांनी अटक केली.15 एप्रिल रोजी चौथा संशयित आरोपी म्हणून प्रभाकर शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली.