आजन्म कारावास – क्रूर सिरीयल बलात्कारी आरोपीस धाराशिव कोर्टाने सुनावली शिक्षा
बालगुन्हेगार ते सीरिअल बलात्कारी – लहान मुलीवरील अत्याचारात शिक्षा भोगून आला की करायचा कांड
धाराशिव – समय सारथी
क्रूर सिरीयल बलात्कारी आरोपीस आजन्म कारावास / जन्मठेपेची शिक्षा व आर्थिक दंड ठोठावला आहे. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांच्या कोर्टाने ही शिक्षा सुनावली अशी माहिती पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत, मनीष कुमार उपस्थितीत होते.
अंकुश वडणे असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असुन त्याने आजवर 4 अल्पवयीन मुलीवर व इतर 3 महिला अत्याचाराचे असे 7 गुन्हे केले आहेत तर त्याला 2 वेळेस कोर्टाने यापूर्वी शिक्षा सुनावली आहे तर 3 प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. शिक्षा भोगून आला की तो पुन्हा लहान मुलीवर बलात्कार करायचा.यापूर्वी त्याने 4, 8, 10 व 6 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला आहे.
शिक्षा सुनावल्यावर त्याच्या चेहऱ्यावर कोणताही पश्चाताप वा दुःख नव्हते तर शिक्षा सुनावल्यावर त्याच्या आईला कोर्टात रडू कोसळले. पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे, पोलीस अंमलदार गवळी यांच्या पथकाने 2 महिन्यात केलेला तपास यात महत्वपूर्ण ठरला, यात 22 साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीने शांत डोक्याने, पुर्वनियोजित क्रूरतेने हे कृत्य केल्याचा युक्तीवाद करण्यात येत फाशीची मागणी केली मात्र मा कोर्टाने 3 वेगवेगळ्या कलमात जन्मठेप व 81 हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शेंडे यांनी मुलीला वैद्यकीय व शैक्षणिक आधार देण्याचा प्रयत्न केला. मुलीला वैद्यकीय मोफत मदत व शैक्षणिक खर्च करण्याचे आदेश राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाला दिले.यामुळे पीडित मुलीला आधार मिळाला.
तुळजापूर येथील एका गावात 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना 30 ऑगस्ट 2022 रोजी घडली होती. गावकऱ्यांनी त्यावेळी एका आरोपीला अटक करुन पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आरोपीने बलात्कार व त्याचे मोबाईलमध्ये व्हिडिओ चित्रीकरण केले होते.
एक लहान मुलगी घराच्या पाठीमागे शौचास गेली असता तिला शेजारील शेतात नेहून अत्याचार केला. मुलीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून काही महिला शेतात गेल्यावर आरोपी दुषकृत्य करताना दिसला, आरोपी नग्न होता त्याला तसेच पकडून चोप दिला. तुळजापूर पोलिसात पोस्को कायद्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता.मी शाळेत गेले असते तर असे झालेच नसते असे वक्तव्य त्या मुलीने हुंदके देत केले त्यावेळी उपस्थित महिलांना अश्रू अनावर झाले होते.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून सोलापूर येथील निलेश दत्तात्रय जोशी यांची नेमणूक केली होती त्यांना ऍड वैशाली देशमुख, यशश्री निलेश जोशी, ओंकार संतोष परदेशी यांची सहकार्य केले तर आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव जिल्हा विधिज्ञ मंडळाने घेतला होता त्यामुळे त्याला वकील मिळाला नाही त्यावेळी आरोपी याला विधी सेवा प्राधिकरणने मदत करीत ऍड विजयकुमार शिंदे यांची नेमणूक केली. शिंदे यांनी केलेल्या कामाचे कोर्टाने कौतुक केले. आजन्म जन्मठेप ऐवजी फाशीची शिक्षा मिळावी यासाठी अपील करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. विशेष सरकारी वकील म्हणून त्यांना देण्यात येणारी 3 लाख रुपयांची फीस ते मनोधैर्य योजनेत सरकारला देणार असल्याचे जोशी यांनी जाहीर केले.
बालगुन्हेगार ते सीरिअल बलात्कारी – लहान मुलीवरील अत्याचारात शिक्षा भोगून आला की करायचा कांड
तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील आरोपी अंकुश वडणे हा लहानपणीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता. तो कधी अंकुश शिंदे तर कशी अंकुश सरवदे अशी नावे सांगत बलात्कारसारखे कांड करायचा. आरोपी अंकुश याने तो 15 वर्षाचा असताना पहिला गुन्हा 2002 साली केला त्यात त्याला बालसुधारगृहात टाकण्यात आले त्यानंतर त्याची 2007 मध्ये सुटका करण्यात आली. सुटून आल्यावर त्याने 2009 साली पुणे येथील खडकी येथे 4 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला तेव्हा त्याला पोस्को अंतर्गत 10 वर्षाची शिक्षा झाली ती शिक्षा भोगून तो 5 नोव्हेंबर 2016 रोजी बाहेर आल्यावर त्याने 7 महिन्यात 2 जुन 2017 मध्ये पुन्हा सोलापूर येथे 8 वर्षीय मुलीवर बलात्कार केला, त्याच वर्षी त्यांनी 2 मुलींचे अपहरण व एक विनयभंग असे 3 गुन्हे केले. 2017 साली त्याला 6 वर्षाची शिक्षा झाली ती शिक्षा भोगून तो 30 एप्रिल 2022 रोजी बाहेर आला त्यानंतर अवघ्या 4 महिन्यात त्याने 30 ऑगस्ट 2022 रोजी 6 वर्षीय मुलीवर बलात्कार केला.