धाराशिव – समय सारथी
पैशाच्या देवाण घेवाणीवरून दोन शिक्षकात वाद झाला होता त्या वादातुन एका शिक्षकाने दुसऱ्या शिक्षकांचा खुन केला. खुन करणाऱ्या शिक्षकास धाराशिव येथील न्यायालयाने जन्मठेपेची व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपी धीरज बाबू हुंबे ( कुरणे नगर धाराशिव ) याने सहकारी शिक्षक शामराव उत्तमराव देशमुख यांचा दगड डोक्यात मारून खुन केला होता. या प्रकरणात एका 8 वर्षाच्या मुलाची व एका प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांची साक्ष महत्वाची ठरली. जिल्हा सरकारी वकील तथा शासकिय अभियोक्ता महेंद्र देशमुख यांनी सादर केलेला पुरावा व युक्तिवाद ग्राहय धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. जी मोहीते यांनी आरोपीस शिक्षा ठोठावली.
दोन्ही शिक्षक एकाच संस्थेमध्ये शिक्षक या पदावर कार्यरत होते. 21 फेब्रुवारी 23 रोजी फिर्यादीचे वडिल मयत शामराव उत्तमराव देशमुख हे मोटारसायकलवरून आरोपीच्या घरासमोरून बाहेर जात असताना आरोपीने शामराव देशमुख यांना पैशाच्या व्यवहारावरून डोक्यात दगड मारला. देशमुख हे मोटार सायकलवरून खाली पडले असता आरोपीने पुन्हा दगडाने मारहाण केली. जखमी देखमुख यांना तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता ते मयत असल्याचे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. धाराशिव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होवुन तपासी अंमलदार सहायक पोलीस निरीक्षक बी आर कांबळे यांनी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. या प्रकरणात 9 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. सदर प्रकरणामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने आरोपीची ओळख पटविण्यासाठी श्वान पथकाची मदत घेण्यात आली व त्याअनुषंगाने साक्षीदार तपासण्यात आले. आरोपी धिरज हुंबे यांना जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास १ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावली. कोर्ट पैरवी म्हणून श्रीमती साठे यांनी काम पाहीले.