धाराशिव – समय सारथी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर तुळजापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. युवक काँग्रेसचे नेते ऋषिकेश मगर यांच्या नेतृत्वाखाली अनेक सरपंच, उपसरपंच, बाजार समिती संचालक आणि प्रमुख कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः या सर्वांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वाकडून निर्णय प्रक्रियेत विश्वासात घेतले जात नसल्याने नाराज असलेल्या अनेक पदाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. ऋषिकेश मगर यांनी तालुक्यातील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोट बांधून थेट शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या प्रवेशामुळे तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात असून, हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे.
‘मातोश्री’वर झालेल्या या कार्यक्रमावेळी कार्यकर्त्यांनी “उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या पक्षप्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे.
यावेळी तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, शहर संघटक अर्जुन साळुंखे, सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, उपजिल्हाप्रमुख सुनील जाधव, श्याम पवार, जिल्हा संघटक राजअहमद पठाण, शहर प्रमुख सुधीर कदम, बालाजी पांचाळ यांच्यासह तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
युवक काँग्रेसचे नेते ऋषिकेश मगर यांच्यासोबत काठीचे सरपंच सुजित हंगरकर, वडगाव (काटी) चे सरपंच गौरीशंकर कोडगिरे, उद्योजक मोहन जाधव, वाडीबामणीचे उपसरपंच अमर माने, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र ढवळे, कोरेवाडीचे सरपंच कोकरे, वडगाव (लाख) चे सरपंच बालाजी चंदनशिवे, माजी सरपंच दिलीप सावंत, शहाजी देवगुंडे, काक्रंब्याचे माजी सरपंच प्रभाकर घोगरे, माजी सरपंच मदने, सावरगावचे ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब काडगावकर आणि जळकोटचे उपसरपंच प्रशांत नवगिरे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधले.