धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील दारू उत्पादन करणाऱ्या ऍडलर्स कंपनीच्या दुषित पाणी व इतर तक्रारीबाबत चौकशी करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी 5 जणांची चौकशी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत. कळंब उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीत कळंब तहसीलदार, पोलिस निरीक्षक, उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व संभाजीनगर येथील प्रदूषण नियंत्रण अधिकारी यांचा समावेश आहे. या समितीने कंपनीच्या ठिकाणी जाऊन 7 दिवसात संयुक्त पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आमदार कैलास पाटील यांनी सुद्धा या प्रकरणात लक्ष घातले असुन गावकऱ्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल पाठपुरावा सुरु केला आहे.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या लातूर येथील अधिकारी यांना 18 जुलै रोजी ऍडलर्स कंपनीच्या ठिकाणी भेट देऊन सरपंच व गावकरी यांच्या उपस्थितीत पंचनामा केला त्यात अनेक बाबी उघड झाल्या आहेत. ड्रायर सेक्शन मधील इस्ट स्लज सोबत पावसाचे पाणी मिक्स होऊन बंधाऱ्यात गेले, नैसर्गिक नाल्यात काळे पाणी झाले असुन ते पाझर तलावात जात आहे. या पाण्याला विशिष्ट प्रकारचा वास होता असे नमूद करुन कारखाना व जवळील भागातील 6 ठिकाणचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.
ऍडलर्स कंपनीतून निघणाऱ्या खराब पाण्यामुळे गौरगाव ग्रामस्थांना विस्थापित होण्याची वेळ आली आहे. कंपनीने पाणी उपाययोजना न करता सोडल्याने गावातील पाणीपुरवठ्याला दूषित पाणी येत आहे तर आसपासची जमीन नापिक झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. याबाबत शाम कापसे व अक्षय वाघ या दोघांनी लेखी तक्रार दिली त्यानंतर दैनिक समय सारथी वृत्तपत्राने आवाज उठवल्यावर चौकशी समिती गठीत करण्यात आली. दुषित पाणी पिण्याची शिक्षा मिळत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
गौरगावच्या काही अंतरावरच वनक्षेत्राला लागून धान्यापासून दारू निर्मितीचा कारखाना सुरू आहे. या कारखान्याने कारखान्यातून निघणाऱ्या घाण पाण्याची प्रक्रिया करण्याची पर्याप्त उपाययोजना व सोय केलेली नाही परिणामी या गावच्या परिसरात हे पाणी जमिनीत मुरून जमिनीचा पोत खराब होत असल्याने जमीन नापीक झाली आहे शिवाय जंगल शेजारी असुन पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे.कारखान्यातील पाणी बाहेर वाहून गेल्याने काही विहिरींना काळ पाणी आले असून गावकऱ्यांना नेहमीच साथीचे आजार बळावत आहेत. आता याच पाण्याला वैतागलेल्या गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी व पर्यावरण विभागाकडे याच्या तक्रारी केल्या असून आम्हाला या होणाऱ्या दूषित पाण्याचा त्रासापासून वाचवा किंवा गाव विस्थापित करा अशी मागणी केली आहे.