धाराशिव – समय सारथी
माळुंब्रा गावच्या सरपंच सुरेखा नागनाथ सुतार यांना जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी अपात्र ठरविले असून सुतार यांना निवडणुकीचा खर्च वेळेत सादर न करणे भोवले आहे त्यामुळे सुनावणी अंति जिल्हाधिकारी यांनी अपात्रतेचे आदेश दिले आहेत.
विनोद राजाराम देवकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्याकडे 15 डिसेंबर 2024 रोजी तक्रार दिलेली होती .सदर तक्रारीच्या अनुषंगाने सरपंच सुरेखा नागनाथ सुतार यांनी माळुंब्रा ग्रामपंचायत कार्यालयाची 2022 मधील सार्वत्रिक निवडणूक लढवलेली होती. सदर ग्रामपंचायतची निवडणूक लढवत असताना त्यांनी जनतेतून सरपंचपदाची निवडणूक लढवली होती तसेच एका प्रभागांमधून देखील सदस्य पदाची निवडणूक त्यांनी लढवलेली होती, दोन्ही ठिकाणी त्या निवडून आलेल्या आहेत परंतु राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक 15 ऑक्टोबर 2016 रोजी च्या आदेशान्वये निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक ग्रामपंचायत सदस्यांनी त्याच्या प्रत्येक निवडणुकी करिता स्वतंत्र बँक खाते काढून ते बँक खात्याचा तपशील त्याच्या नामनिर्देशन पत्रासोबत जोडने निवडणूक प्रक्रिया भाग घेणाऱ्यावरती बंधनकारक होते
निवडणुकीचा सर्व खर्च हा त्या बँक खात्यावरूनच करणे आवश्यक होते परंतु सदर गैर अर्जदार सुरेखा नागनाथ सुतार यांनी दोन निवडणुका लढवल्या म्हणजेच सदर ग्रामपंचायत कार्यालयाच्या सरपंचपदाची तसेच सदस्य पदाची निवडणूक लढवली परंतु त्यांनी त्या दोन निवडणुकाकरिता दोन स्वतंत्र वेगवेगळी खाते काढलेली नाहीत त्यांनी एकच बँक खाते लोकमंगल बँकेमध्ये काढले व त्या खात्यावरून देखील सदर निवडणुकीचा सर्व खर्च केलेला नाही. या कारणास्तव त्यांना सदर ग्रामपंचायत कार्यालयाचा सदस्य व सरपंच म्हणून राहण्यास तसेच पुढील सहा वर्षासाठी सदर ग्रामपंचायत कार्यालयाची निवडणूक लढविण्यास जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी अपात्र केलेले आहे.
सदर प्रकरणात अर्जदार विनोद देवकर यांच्यावतीने विधीज्ञ दत्तात्रय घोडके तुळजापूर यांनी युक्तिवाद केला. त्यांना विधिज्ञ प्रतीक जगदाळे ,विधीज्ञ सचिन भांजी ,विधीज्ञ शुभम झाडपिडे यांनी सहकार्य केले.