धाराशिव – समय सारथी
जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या विरोधात केलेली तक्रार व बातमी खोटी निघाल्यास धाराशिव लाईव्हचे संपादक सुनिल मधुकर ढेपे व तक्रारदार बाळासाहेब वसंत सुभेदार या दोघांना फाशी दिली जावी अशी मागणी स्वतः सुभेदार यांनी राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. आरोप खरे ठरल्यास दोषीवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे हे बोगस नॉन क्रेमीलिअर प्रमाणपत्राचा वापर करुन शासकीय सेवेत रुजू झाल्याची तक्रार सुभेदार यांनी केली होती त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आरोप खोटे व चुकीचे असल्याचे सांगत ते नाकारले होते. जिल्हाधिकारी यांच्यावर खोटे आरोप करुन त्यांची वारंवार बदनामी केली जात आहे यामुळे प्रशासनाचे खच्चीकरण होत असुन असंतोष निर्माण होत असल्याने महसूल अधिकारी व कर्मचारी संघटना यांनी या प्रवृत्तीचा निवेदन देऊन निषेध केला.
जिल्हाधिकारी यांच्यावर झालेल्या आरोपावर दैनिक समय सारथी, पुण्य नगरी यासह अन्य वृत्तपत्राने त्यांचे म्हणणे मांडले होते तर प्रसिद्ध अभिनेते सोमनाथ तडवळकर यांनी ओम्बासे हे चांगले प्रशासकीय अधिकारी असल्याचे सोशल मीडियावर पोस्ट करीत बाजु घेतली तर महसूल संघटनानी निषेधाचे निवेदन दिले. हे सगळे खोटे आहेत, या सगळ्यावर आक्षेप घेत सुभेदार यांनी माझेच खरे आहे असे म्हणत खोटे निघाल्यास सुनिल मधुकर ढेपे व मला (बाळासाहेब वसंत सुभेदार) फाशी द्या अशी मागणी केली आहे. या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीश किंवा सनदी अधिकारी मार्फत करावी असेही निवेदनात म्हणटले आहे.
यानिमित्ताने ठरवून माहितीचे अधिकार, तक्रार व निवेदन द्यायचे आणि त्याच्या बातम्या करायच्या अशी ‘जोडी’ उघड झाली आहे. एखाद्याचे म्हणणे किंवा दुसरी बाजु मांडली की सगळे चोर, खोटे अश्या आवेशात नैसर्गिक न्याय तत्व, प्रक्रिया न पाहता थेट निकाल जाहिर करुन त्याला सोईनुसार दोषी ठरवायचे व स्वतःची टिमकी वाजवायची हा हेकेखोरपणा वाढला आहे. समाजसेवेच्या गोंडस नावाखाली अनेक अपप्रकार वाढले आहेत.