काम बोलतंय, मंत्री सावंत यांनी विकास केला – महाविजय संकल्प सभेत मुख्यमंत्री यांनी केले कौतुक
परंडा – समय सारथी
7 टीएमसी पाणी उजनीतुन गुढीपाडव्यापर्यंत येणार आहे. भुम परंडा वाशी या तिन्ही तालुक्यात शिवाजी महाराज पुतळा बसवणार, वीज वितरण व्यवस्था सुधरवायची आहे.तुमचं काम बोलतंय, गेल्या 35 वर्षाचा या मतदार संघाचा बॅकलॉग भरून काढायचा आहे असे त्यासाठी मी तुमच्या पाठीशी उभा आहे. सावंत यांना आमदार म्हणुन निवडुन द्या मी पुन्हा एकदा त्यांना नामदार मंत्री करायची जबाबदारी माझ्यावर असल्याचे वचन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. स्थानिक विकासाच्या मुद्यावर निवडणुक लढवीत आहोत, संविधान बदलणार नाही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परंडा येथील कोटला मैदानात महाविजय संकल्प सभा घेतली व विकासासाठी महायुतीचे उमेदवार सावंत यांना रेकॉर्डब्रेक मतांनी निवडुन द्यावे असे आवाहन मतदार यांना केले. यावेळी व्यासपीठवर माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, पाशाभाई पटेल यासह महायुतीचे नेते, पदाधिकारी उपस्थितीत होते.
आजची ही जाहिर सभा विजयाची सभा आहे. भर उन्हात दुपारी 2 वाजता लोकांनी गर्दी केली त्या बद्दल लोकांचे आभार मुख्यमंत्री शिंदे यांनी मानले. ही गर्दी सावंत यांना रेकॉर्डब्रेक मतांनी विजयी केल्याशिवाय राहणार नाही आणि 23 नोव्हेंबरला मी स्वतः फटाके फोडायला इथे येणार असे वचन दिले. सावंत हे परंड्याचे किल्लेदार असुन ते भगवा व धनुष्यबाण घेऊन काम करीत आहेत. तानाजीराव जादूगर असुन ते लोकांवर प्रेम करतात, लोकांना एकत्र करण्याची जादू सावंत यांच्यात असल्याने इथे भर उन्हात गर्दी झाली.
इथे निवडणुकीच्या रिंगणात उबाठा नाही, मशाल पण नाही इथे तुतारी आहे. शिवसेना आमची म्हणनाऱ्यांनी मशाल विकून टाकली व मतदार संघ पण देऊन टाकला. क्रांतीची मशाल नसुन घराघरात आग लावणारी, पेटवणारी, द्वेष व तेढ निर्माण करणारी मशाल आहे त्यामुळे ती विझवून टाका, हवा इकडे तेज आहे मशाल राहत नाही, तुतारी वाजत नाही. अंगात नाही बळ चिमटा काढुन पळ, तानाजीरावा समोर आपली डाळ शिजत नाही, पडायची भीती वाटत होती म्हणुन दुसरा उमेदवार दिला.
भुम परंडा शिवसेनेचा धनुष्यबानाचा बालेकिल्ला राहिला आहे. बाळासाहेब यांनी कामाविलेल्या धनुष्यबाणाची आण बाण शान राखण्याची जबाबदारी नियतीने आपल्यावर दिली आहे. बाळासाहेब यांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली तो दिवस सर्वात दुर्दैवी होता. शिवसेनेचे खच्चीकरण, बाळासाहेब यांचे विचार संपवायला निघाले त्यामुळे आम्ही धाडस करुन उठाव केला तेव्हा तानाजीराव माझ्या खांद्याला खांदा लावुन उभे होते. सामान्य लोकांच्या मनातील सरकार आणले. अडीच वर्षात महाविकास आघाडीने केलेली आणि आम्ही केलेली कामे पहा. दुध का दुध पाणी होऊन जाऊ द्या असे म्हणत विरोधकांना आव्हान दिले.
मंत्री सावंत यांनी आरोग्य विभागात अनेक योजना आणल्या जागरूक पालक सुदृढ बालक, आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्रचे, आरोग्याची वारी पंढरीच्या दारीचे जागतिक रेकॉर्ड झाले. आम्ही अडीच वर्षाचे रिपोर्ट कार्ड देतो तुम्ही हिशोब द्या, त्याला हिम्मत, धाडस लागते मात्र त्यांनी जलयुक्त शिवारसह मेट्रो, समृद्धी,मराठवाडा वॉटर ग्रीड बंद केले. पहिल्या अडीच वर्षात काही निधी मिळाला नाही मात्र शिंदे मुख्यमंत्री झाल्यानर दीड ते दोन हजार कोटी दिले. एकनाथ शिंदे देणारा आहे, ही देना बँक आहे लेना बँक नाही असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
लाडकी बहीण योजना सुरु केली, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना दीड हजारची किंमत काय कळणार, योजना बंद होणार असे सांगितले. कोर्टात गेले,सरकार पैसे काढुन घेईल असा अपप्रचार केला मात्र आम्ही 5 हप्ते असा लाभ महिलांना दिला. आम्हाला जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली मात्र घाबरलो नाही, मी आंदोलन करुन जेल भोगून इथंपर्यंत आलो आहे मला पोकळ धमक्या काय देता. मी जनतेसाठी दहा वेळेस जेलमध्ये जायला तयार आहे पण ती वेळ येणार नाही कारण त्यांचे सरकार येणार नाही असे लोकांनी ठरवले आहे.
लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवू तिला लखपती बघायचे आहे, 1500 ऐवजी 2100 देणार. शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार आहेत, शेतकरी सन्मान योजना 15 हजार, प्रत्येकाला अन्न, वस्त्र व निवारा देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. ज्येष्ठ नागरिक यांना 2100 पेन्शन देणार, जीवनावश्यक वस्तूचे भाव 5 वर्ष स्थिर ठेवणार, 25 लाख रोजगार निर्मिती, 45 हजार गावात पानंद रस्ते, वीज बील सवलत देणार, हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर बाकी है. सरकार आल्यावर 100 दिवसात व्हिजन महाराष्ट्र राबवायचे आहे त्यासाठी मनगटात धनुष्यबाण पकडायला ताकत लागते, मनगट मजबूत व सिंहाचे वाघाचे काळीज लागते. लांडग्याला वाघाचे कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. वाघ वाघच असतो, बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांची शिकवण,विचार पुढे नेतो असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
धाराशिव जिल्ह्यातुन उठवाची मुहूर्तमेढ जिल्हा परिषदेच्या माध्यमातुन सुजितसिंह ठाकुर व मी रोवली व त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले. दुष्काळात मोफत पाणी, टँकर, चारा छावणी सुरु केल्या, गोरगरीब मुलांचे शिक्षण केले, सामुदायिक विवाह सोहळे माध्यमातुन 2 हजार लग्न लावले असे सांगत पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी विकासाचा लेखाजोखा मांडला.
अडीच वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार होते, सावंत व आम्ही अनेक वेळा कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी 11 हजार 700 कोटीची सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी यासाठी भेटलो मात्र दिली नाही. पाणी उपलब्धता प्रमाणपत्र नव्हते, बिन पाण्याची योजना होती त्यावेळी ते मिळवून दिले. पाण्याच्या नावावर शेतकऱ्यांच्या भावनेवर राजकारण केले, मते मिळवली त्यांना जनता माफ करणार नाही असे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर म्हणाले.