परंडा – समय सारथी
भुम परंडा वाशी मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात शिवसेना उबाठा नाही, मशाल पण नाही इथे तुतारी आहे. शिवसेना आमची म्हणनाऱ्यांनी मशाल विकून टाकली व मतदार संघ पण राष्ट्रवादीला देऊन टाकला. शिवसेनेचे चिन्ह हे क्रांतीची मशाल नसुन घराघरात आग लावणारी, माणसे पेटवणारी, द्वेष व तेढ निर्माण करणारी मशाल आहे त्यामुळे ती विझवून टाका, हवा इकडे तेज आहे मशाल राहत नाही, तुतारी वाजत नाही. अंगात नाही बळ चिमटा काढुन पळ, तानाजीरावासमोर आपली डाळ शिजत नाही, पडायची भीती वाटत होती म्हणुन जागा सोडली व दुसरा उमेदवार दिला अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांन परंडा जाहिर सभेत केली.
भुम परंडा वाशी मतदार संघात महाविकास आघाडीकडुन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार माजी आमदार राहुल मोटे व महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार तथा विद्यमान पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्यात लढत थेट होत आहे. शिवसेना उबाठा गटाचे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचा एबी फॉर्म देत माजी आमदार कै ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांना उमेदवारी दिली होती, त्यांनी अर्जही भरला मात्र उमेदवारी वापस घेण्याच्या शेवटच्या क्षणि रणजित पाटील यांनी मातोश्रीचा आदेश पाळत माघार घेतली.
भुम परंडा शिवसेनेचा धनुष्यबानाचा बालेकिल्ला राहिला आहे. बाळासाहेब यांनी कामाविलेल्या धनुष्यबाणाची आण बाण शान राखण्याची जबाबदारी नियतीने आपल्यावर दिली आहे. बाळासाहेब यांची शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली तो दिवस सर्वात दुर्दैवी होता. शिवसेनेचे खच्चीकरण, बाळासाहेब यांचे विचार संपवायला निघाले त्यामुळे आम्ही धाडस करुन उठाव केला तेव्हा तानाजीराव माझ्या खांद्याला खांदा लावुन उभे होते. सामान्य लोकांच्या मनातील सरकार आणले. तानाजी सावंत हे जादूगर असुन त्यांचा नाद करू नका असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
भुम परंडा वाशी मतदार संघात 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राहुल मोटे हे 2004, 2009, 2014 असे सलग 3 टर्म आमदार होते तर त्यांचे वडील महारुद्र बप्पा मोटे हे 1985 व 1990 असे 2 टर्म आमदार होते. इथे त्यांची 2024 मध्ये आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या विरोधात लढत होत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मते पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती.