धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक केलेला आरोपी विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे याचा भाजप पक्षाशी काहीही संबंध नाही, तो पदाधिकारी किंवा सदस्यही नाही.आम्ही ड्रग्ज सारख्या गोष्टी व तस्करांना थारा देत नाहीत असे स्पष्टीकरण भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य यांनी दिली. पिंटू मुळे याची आई तुळजापूर पंचायत समितीची माजी सभापती असुन त्या काँग्रेसमध्ये निवडुन येऊन नंतर भाजपात गेल्या. मुळे याने पंचायत समितीत सत्तापरिवर्तन घडवुन आणले होते. मुळे याला पोलिसांनी ड्रग्ज तस्करीत अटक केली असुन 13 मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. मुळे याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत असलेले काही फोटो समोर आले होते त्यानंतर जिल्हाध्यक्ष चालुक्य यांना विचारले असता त्यांनी भाजपचा व मुळेचा काही संबंध नसल्याचे सांगितले. मुळे याबाबत आमदार पाटील यांनी कोणतेही स्पष्टीकरण व भुमिका जाहीर केलेली नाही, ती गुलदस्त्यात आहे. एकंदरीत तुळजापूरमध्ये पक्ष म्हणुन भाजप व नेतृत्व म्हणुन आमदार पाटील यांची स्वतंत्र यंत्रणा व फळी असल्याचे यावरून दिसुन येते. पंचायत समितीत सत्ता परिवर्तन झाल्यावर त्याची ‘फळे’ कोण चाखली असाही प्रश्न आहे.
आमदार पाटील तुळजापुरात ड्रग्ज तस्करीची कीड साफ करीत असल्याचा दावा करत आहेत मात्र त्यांच्या सोबत सावली सारखे असलेले नेते ड्रग्ज तस्करी व व्यसनाच्या आहरी गेले आहेत. आमदार पाटील यांच्या काळात तुळजापूर येथे ड्रग्ज तस्करीचा धंदा रुजला व वाढला, त्यांना अनेक गोष्टी माहिती असताना त्यांनी 2 वर्ष काही बाबीकडे कानाडोळा केला. लोकप्रतिनिधी असलेल्या आमदार पाटील यांची राजकीय हतबलता, मजबुरी यातून स्पष्ट होते. आमदार पाटलांकडे ड्रग्ज तस्कर मुळेला प्रत्येक कार्यक्रमात मानाचे ‘पान’ होते, असे अनेक जण त्यांचे कार्यकर्ते आहेत, तुळजापूरला 2 वेळेस पोलिसांनी ड्रग्ज जप्त केले आहे त्यावरून ड्रग्ज मुळापर्यंत पोहचले आहे असे दिसते.
तुळजापूर येथील अनेकांना पिंटू मुळे याने ड्रग्जच्या सेवनाला नादी लावले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुळेने राजकीय स्तिथीचा फायदा घेत ड्रग्जचा व्यवसाय चांगलाच थाटला, तुळजापूरमधील नेत्यांना ड्रग्ज तस्करीची माहिती होती मात्र त्यांनी बेरजेचे राजकारण व फायद्यासाठी कानाडोळा केला असा जनतेचा आरोप आहे. आमदार पाटील यांनी मनावर घेत मौन सोडल्यास पोलिसांचे बरेच तपासाचे काम हलके होईल, आमदार पाटील ‘ती’ नावे पोलिसांना देणार असाही विश्वास तुळजापूरकर जनतेला आहे.
ड्रग्ज तस्करी बाबत काही माहिती असल्यास नागरिकांनी त्याची माहिती द्यावी न घाबरता द्यावी, नाव गोपनीय ठेवले जाईल असे आवाहन आमदार यांनी केले आहे. आमदार पाटील यांनी आधी त्यांना माहिती असलेली नावे पोलिसांना लेखी द्यावीत व ती जाहीर करावीत असे प्रतिआवाहन तुळजापूरकरानी केले आहे.