मदत व पुनवर्सनासाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांचे मोठे पाऊल, नियंत्रण, कडक कारवाईचा इशारा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांसोबत जनावरे, जमिनी व सार्वजनिक मालमत्तांचे मोठे नुकसान झाले. या सर्व नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत. काही पंचनामे झाले असून भरपाईसाठी निधी मंजूर झाला आहे. आणखी पंचनामे सुरु असून त्यांच्या भरपाईसाठीही लवकरच निधी मंजूर होईल. या परिस्थितीत नुकसानीच्या पंचनाम्यापासून प्रत्यक्ष मदत वाटपापर्यंतच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून मदत व पुनर्वसनाचे काम पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सर्व तालुक्याच्या तहसील कार्यालयात कॅम्प ऑफिस स्थापन केले आहे.
आठही तालुक्याला संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून अपर जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांची जिल्हास्तरावर संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. यामुळे अतिवृष्टी व पुरग्रस्तांसाठी स्वतंत्र यंत्रणेच्या माध्यमातून तातडीने कामकाज होणार आहे.
जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी सांगितले, की धाराशिव जिल्ह्यात माहे ऑगष्ट व सप्टेंबर २०२५ या महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा बाधित व क्षतिग्रस्त झाल्या आहेत. प्रामुख्याने भूम व परंडा या तालुक्यात शेती पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असून मोठ्या संख्येने जनावरे मृत्यूमुखी पडलेले आहेत. या सर्व नुकसानीचे पंचनामे करुन तातडीने अहवाल देण्यासाठी सर्व क्षेत्रिय अधिकारी व कार्यालयांना आदेश दिले आहे. त्यानुसार पंचनामे व स्थळपाहणीचे काम वेगाने सुरु आहे.
पुरग्रस्त व अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदतीचा ओघ सुरु झाला असून काही स्वयंसेवी संस्था (एनजीओ) त्यासाठी पुढाकार घेत आहेत. शासनाकडून मिळणाऱ्या मदतीसाठीही प्रशासनाकडून पंचनामे वेगाने सुरु असून ऑगस्टमधील अतिवृष्टी अनुदानाचे वाटप सुरु करण्यात येत आहे. या परिस्थितीत अतिवृष्टीग्रस्त व पुरग्रस्तांच्या मदत कार्य पारदर्शकपणे व प्राधान्याने पार पाडण्यासाठी कॅम्प ऑफिस स्थापन करुन त्या ठिकाणी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे.
मदत व पुनर्वसनाचे काम होईपर्यंत कॅम्प ऑफिस व संपर्क अधिकारी कार्यरत राहणार असून ते दररोज कामकाजाचा आढावा घेऊन दैनंदिन कार्यवाहीची माहिती जिल्हा संपर्क अधिकारी ज्योती पाटील यांना देणार आहेत. या कामात दिरंगाई, टाळाटाळ व निष्काळजी केल्याचे दिसून आल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी याबाबत काढलेल्या आदेशात नमुद केले आहे.
तालुका संपर्क अधिकाऱ्यांची कामे
१) ऑगष्ट व सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरामुळे झालेल्या जिवित व वित्तहानी संबधीत आवश्यक त्या उपाययोजना राबविणे
२) पुरामुळे बाधीत नागरीकांसाठीच्या मदत व पुनर्वसन कामाचा आढावा घेऊन व त्यासाठी उपाययोजनांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे
३) घरामध्ये पुराचे पाणी गेलेल्या नागरीकांना तातडीची मदत पुरविणे व या मदतीचा नियमित आढावा घेणे
४) ऑगष्टमधील नुकसानीसाठी शासनाकडून वाटप होत असलेल्या मदतीवर नियंत्रण ठेवून त्याचा आढावा घेणे
५) विविध स्वयंसेवी संस्था व एनजीओंकडून आलेल्या जीवनावश्यक मदतीचे पुरग्रस्तांना मदत वाटप करण्यासाठी संपर्क व समन्वय साधणे
६) पुरवठा विभागाकडून पुरग्रस्तांना करण्यात येत असलेल्या धान्य वाटपाचा आढावा घेणे व मदतीचे वाटप करणे
७) पशुसंवर्धन विभागाकडून पुरग्रस्त भागातील जनावरांसाठी आवश्यक चारा व लसीकरणाच्या उपाययोजनांचा आढावा घेणे
८) पुरग्रस्त भागात नागरीकांना पिण्याचे पाणी व वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देणे
९) नगर पालिकास नगर पंचायत व ग्रामपंचायतीकडून पुरग्रस्त भागात स्वच्छता मोहिम राबवणे.
१०) तालुकाअंतर्गत पुरग्रस्त भागात आवश्यक कामकाजाचा आढावा घेणे
संपर्क अधिकारी – पद – ठिकाण – मोबाईल नंबर
ज्योती पाटील – अपर जिल्हाधिकारी – जिल्हाधिकारी कार्यालय – 985004132
अरुणा गायकवाड – उपजिल्हधिकारी (पुनर्वसन) – धाराशिव तालुका – 7350015079
शिरीष यादव- उपजिल्हाधिकारी (निवडणूक) – कळंब तालुका – 9503450001
स्वाती शेंडे – उप जिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) – उमरगा तालुका – 9822540237
संतोष राऊत – उपजिल्हाधिकारी (मध्यम प्रकल्प) – भूम – 9075908869
प्रवीण धरमकर – उपजिल्हाधिकारी (रोहयो) – परंडा – 9422744007
अनंत कुंभार – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) – तुळजापूर – 9130963991
मनोज राऊत – उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) – लोहारा – 9021443185
अमोल ताकभाते – सहायक संचालक (इतर बहुजन कल्याण विभाग)- वाशी – 7588797265