जलसंपदा बनतेय धनसंपदेचा मार्ग – बड्या राजकीय नेत्याचा वरदहस्त, ग्रामस्थांनी केली पोलखोल
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या कृष्णा मराठवाडा खोऱ्यातील काही कामे निकृष्ट पद्धतीने सुरु असल्याची बाब समोर आली असुन ग्रामस्थानी निकृष्ट कामाचा भांडाफोड करीत पोलखोल केली. या पोलखोलीनंतर अधिकाऱ्यांनी काम चुकीच्या पद्धतीने सुरु असल्याची कॅमेरात कबुली दिली मात्र ठेकेदार याच्याकडुन नियमानुसार काम पुन्हा करुन घेऊ असे सांगत कंत्राटदाराला अभय दिले. सत्तेतील एका बड्या दादा नेत्याचा या कंत्राटदारावर वरदहस्त असल्याचे बोलले जात असुन यात कंत्राटदार व पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी होत आहे.जलसंपदा विभाग काही ठेकेदार यांच्यासाठी धनसंपदेचा मार्ग बनला आहे.
मराठवाड्याची दुष्काळातून मुक्ती व्हावी यासाठी राज्य सरकारने महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प मंजुर करीत करोडो रुपयांची कामे टप्याटप्याने सुरु केली आहेत. या योजनेअंतर्गत पांगरदरवाडी येथील काम अंदाजपत्रकानुसार सुरु नसुन काही अधिकारी, ठेकेदारा यांनी या योजनेला हरताळ फासण्याचे काम केले आहे.
पहिल्या टप्यात कृष्णा मराठवाडा खोऱ्याचे 7 टीएमसी पाणी पांगरदरवाडी मार्गे धाराशिव-बीड जिल्हयाला मिळणार आहे. पांगरदरवाडी पंप हाऊस ते कालवा या दरम्यान 540 मीटर भुमिगत पाईपलाईन टाकली जाणार आहे यासाठी 7 कोटी 16 लाख रुपये निधीची तरतुद केली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील निर्माण गोल्ड कंट्रक्शन कंपनीला हे काम दिले आहे,अंथरलेल्या पाईप लाईनला मातीमध्ये बुजवणे अपेक्षित असताना संबधित गुत्तेदाराने पाईपवर मोठ मोठे दगड टाकुन पाईप पुरल्याने पाईपला नुकसान केले आहे.
भविष्यात पाईप फुटुन पाणी गळती होण्याची शक्यता असुन हक्काचे पाणी धाराशिव जिल्हयाला मिळायला उशिर लागणार आहे. 200 मिटर कामाकडे संबधित अधिकाऱ्यानी जाणिवपुर्वक दुर्लक्ष करुन गुत्तेदाराला अभय देण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ग्रामस्थानी केला आहे.पांगरदरवाडी ग्रामस्थानी सदरील काम बंद करुन ठेकेदार, अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
काम अंदाजपत्रानुसार झाले नाही, पुन्हा करुन घेऊ – नाईक
कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक यांनी ठेकेदार हा सॉफ्ट मुरूम ऐवजी तिथे साईटवर उपलब्ध असलेले मोठे दगड टाकत असुन अंदाजपत्रक प्रमाणे काम होत नसल्याचे कबुल केले आहे. ठेकेदार यांच्याकडुन पुन्हा हे काम करुन घेऊ असे सांगत त्यांनी कारवाईच्या प्रश्नाला बगल दिली.