धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत एका न्यूज चॅनेल सारखा व्हिडिओ तयार करून बोगस एक्सिट पोल प्रसारित केल्याप्रकरणी ‘धाराशिव 2.0’ (Dharashiv 2.0) सह इतर 2 इन्स्टाग्राम पेजेसच्या ऍडमिन्स विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी या मागचा षडयंत्रकारी समोर आणावा. आमदार राणाजगजीतसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांचा या प्रकरणात हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केला आहे. व्हिडीओ कांड असुन यात कारवाई करू नये यासाठी अधिकारी यांच्यावर दबाव होता, यात अधिकारी यांनी वेळकाढुपणा केला त्यामुळे त्याची चौकशी करावी अशी मागणी केली.
एक्सिट पोल व्हिडिओबाबत तात्काळ तक्रार देण्यात आली मात्र गुन्हा नोंद करायला इतके दिवस का लागले, हा व्हिडिओ कोणी बनवला, त्या मागचा हेतू काय ? कोणाच्या नंबरवरून पाठवला? या मागचा मास्टर माईंड कोण ? हे सगळे एक षडयंत्र असुन त्याची पोलखोल होणे व सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे अशी मागणी राकेश सूर्यवंशी, सोमनाथ गुरव, रवी वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पेड व फेक न्यूजचा हा प्रकार असुन मतदानावर याचा फरक पडावा यासाठी हे केले आहे. या ऍडमिनचे बँक खाते, राणाजगजीतसिंह पाटील व मल्हार पाटील यांचा तो ऍडमिन कार्यकर्ता असल्याचा आरोप केला आहे. त्याला अटक करून मोबाईल, लॅपटॉप जप्त करावा, फेक व पेड न्यूजचा तपास करावा. कारवाई नाही झाली तर राज्य निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.
2004 च्या निवडणूक वेळी सुद्धा पवनराजे निंबाळकर यांचा डॉ पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा असे वृत्त छापून आणले, त्यावेळी 484 मतांनी पराभव झाला. फेक न्यूज हा रडीचा डाव खेळण्याचा विरोधकांचा जुना डाव आहे. हे तिन्ही पेज व इन्स्टाग्राम बंद करावे अशी शिवसेनेने मागणी केली आहे.
भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 चे कलम 223,337,353 तसेच लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 126 (A) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) 2000 चे कलम 66 (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शकील शेख करत आहेत.
धाराशिव नगरपरिषदेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान नियोजित होते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदानापूर्वीच्या 48 तासांत कोणत्याही प्रकारचे एक्झिट पोल किंवा जनमत चाचण्या प्रसिद्ध करण्यास बंदी असते. मात्र, 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास ‘धाराशिव 2.0.’ (Dharashiv 2.0), ‘जिल्हा धाराशिव’ (jilha dharashiv) आणि ‘ऑल अबाऊट धाराशिव’ all about dharashiv) या सोशल मीडिया पेजेसवरून एक व्हिडिओ व्हायरल करण्यात आला.
या व्हिडिओमध्ये एका बनावट टीव्ही चॅनेलचा वापर करून भाजपच्या उमेदवार सौ. नेहा काकडे या विजयी होत असल्याचे, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या उमेदवार सौ. परवीन खलिफा कुरेशी या दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे भासवण्यात आले होते.
युवासेना तालुकाप्रमुख राकेश हनुमंत सूर्यवंशी आणि गोविंद कोळगे यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, मीडिया सर्व्हेलन्स कक्षाचे सनियंत्रण अधिकारी तथा पालिकेचे उपमुख्याधिकारी विश्वंभर वासुदेवराव सोनखेडकर यांनी सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.











