धाराशिव – समय सारथी
बोगस मतदार नोंदणी अर्ज प्रकरणाचा आणखी एक अंक तुळजापूर विधानसभा मतदार संघात समोर आला असुन तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ या गावानंतर धाराशिव तालुक्यातील रुईभर या गावात 9 बोगस अर्ज सापडले आहेत, हे अर्ज बीएलओ स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. हंगरगा गावात जे बोगस आधारकार्ड नामांकन क्रमांक वापरले गेले आहेत तेच क्रमांक रुईभर येथे वापरण्यात आले आहेत त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या घटनेत एक मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. रुईभर येथे वापरण्यात आलेले आधार कार्डचे नंबर अस्तित्वात नसुन सगळ्यांची वेळ व नंबर एकच आहे. अर्ज भरताना कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे फोटो वापरण्यात आले असुन त्यांच्या आधार कार्डवर रुईभर गावचा पत्ता दाखवला आहे. तुळजापूर मतदार संघात असे प्रकार अनेक गावात झाले असुन एक एक प्रकार समोर येत आहे.
रुईभर गावात राहत नसलेली लोकांच्या नावे अर्ज करण्यात आल्यानंतर अर्ज नोंदणीचे पितळ वेळीच उघडे पडले आहे.उपसरपंच संतोष वडवले यांनी हा प्रकार समोर आणला. राजेंद्र नरसिंग मुंढे, अरबाज अली खान, सोमेश्वर सोमनाथ थोरात, कमलाकर रावसाहेब जाधव, पुनम सतीश लोंढे, विवेक विकास कदम, अनिकेत अनिल कदम,पुजा सतीश दांगट अशी नावे असलेले बोगस आधारकार्ड आधारे मतदार नोंदणी अर्ज केले आहेत.
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील हंगरगा गावात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानंतर तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्याचा तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत. हंगरगा येथे मतदार अर्ज नोंदणी करताना काही अर्जदार यांच्या अर्जासोबत जोडलेल्या आधार कार्डमध्ये नामांकन क्रम म्हणजे इनरॉलमेंट क्रमांक हा एकसारखाच आढळुन आला तसेच आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले, हंगरगा येथील नंबर रुईभर वापरण्यात आले आहेत.
हंगरगा येथील घटनेनंतर निवडणुक विभाग अलर्ट मोडवर आला असुन धाराशिव जिल्ह्यात 20 ऑक्टोबर रोजी रविवारी सर्व 4 ही विधानसभा मतदार संघातील गावात मतदार याद्याचे चावडी वाचन केले जाणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ज्या नावांची नोंदणी करण्यात आली आहे त्या सर्व नावाची व सोबत जोडलेल्या कागदपत्रे यांची पुन्हा एकदा तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिले आहेत. तुळजापूर विधानसभा मतदार संघात जे अर्ज नामंजूर करण्यात आले त्या अर्जाची व सोबत जोडलेल्या कागदपत्रे यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
मतदार याद्याचे चावडी वाचन गावात केले जाणार असुन त्यावेळी काही आक्षेप आले तर त्याची सुनावणी घेऊन नावे मतदार यादीतून कमी करण्यात येणार आहेत. चावडी वाचन वेळी गावात लोकांनी, राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी यांनी हजर राहावे व काही आक्षेप असल्यास नोंदवावेत. कुठे बोगस अर्ज नोंदणी किंवा मतदार नोंदणी झाल्याची माहिती, तक्रार असल्यास लेखी तक्रार जिल्हा प्रशासनाकडे करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी केले आहे.