बेंबळी – समय सारथी
ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेला हादरा देणारी अत्यंत गंभीर घटना बेंबळी येथे उघडकीस आली असून, कोणतेही वैध वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना स्वतःला एमबीबीएस डॉक्टर म्हणून भासवून रुग्णावर उपचार केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात बेंबळी पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी सुधीर मुरलीधरराव झिंगाडे, रा. बेंबळी, ता. जि. धाराशिव याच्याकडे बॉम्बे नर्सिंग होम्स अॅक्ट अंतर्गत कोणतेही वैध नोंदणी प्रमाणपत्र नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच त्याची शैक्षणिक पात्रता केवळ D.M.S. (डिप्लोमा इन मेडिकल सायन्स) इतकी मर्यादित असताना, त्याने स्वतःला एमबीबीएस डॉक्टर म्हणून सादर केले. यासाठी आरोपीने बनावट वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन तयार करून त्यावर MBBS पदवी नमूद केल्याचेही उघड झाले आहे.
फिर्यादीनुसार, दि. 01 जून 2025 रोजी बेंबळी येथे आरोपीने आकाश गोरोबा चव्हाण (रा. रुईभर) याच्यावर निष्काळजीपणे व वैद्यकीय नियमांना छेद देणारे उपचार केले. या चुकीच्या उपचारांमुळे संबंधित रुग्णास गंभीर दुखापत झाली असून, त्याच्या जीवितास व आरोग्यास मोठा धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
या गंभीर प्रकरणी डॉ. विशाल सखाराम पवार (वय 26), वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बेंबळी यांनी दि. 17 डिसेंबर 2025 रोजी बेंबळी पोलीस ठाण्यात प्रथम खबरेचा अहवाल (FIR) दाखल केला आहे.
त्यानुसार आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 318(3), 336(3), 340(2), 125 (अ)(ब) तसेच महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अंतर्गत कलम 3 व 6 आणि महाराष्ट्र नर्सिंग होम्स नोंदणी अधिनियम अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
या घटनेमुळे बेंबळी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बनावट डॉक्टरांच्या साखळीवर तातडीने कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करीत असून, आरोपीने यापूर्वी किती रुग्णांवर उपचार केले, किती जणांच्या जीवितास धोका निर्माण झाला, याची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.











