धाराशिव – समय सारथी
तुळजापूर विधानसभा मतदार संघात बोगस आधारकार्ड आधारे मतदार नोंदणी अर्ज दाखल केलेल्या प्रकाराची व्याप्ती वाढली असुन तब्बल 6 हजार 200 बोगस अर्ज प्रशासनाला तपासणीत सापडले असुन ते तात्काळ नामंजुर करण्यात आले आहेत. आणखी 2 हजार 200 मतदार नोंदणी अर्जाची छानणी / तपासणी सुरु असुन त्यातही काही अर्ज बोगस सापडू शकतात. हे बोगस मतदार नोंदणी अर्ज वेगवेगळ्या गावात मतदार नोंदणीसाठी दाखल करण्यात आले होते, ते बीएलओ स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित होते मात्र प्रशासन वेळीच सतर्क झाल्याने बोगस मतदार नोंदणीचा डाव हाणून पाडला गेला आहे. संघटीत गुन्हेगारी सारखा हा प्रकार असुन याचा मास्टर माईंड पोलिसांनी शोधणे गरजेचे आहे.
विशेष म्हणजे बोगस नोंदणी झालेले पैकी काहीजण परप्रांतीय असल्याचे आडनावावरून दिसून येत आहे.सत्यपाल, कपूर,साबत,अय्यर,खंडेलवाल अशी नावे आहेत. हंगरगा येथील दाखल गुन्ह्यात हे सर्व 6 हजार 200 अर्ज पोलिसांकडे तपासासाठी वर्ग केले जाणार आहेत त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढली आहे. राजकीय आरोप प्रत्यारोप होत असले तरी पोलिसांच्या तपासावर सर्व बाबी अवलंबुन आहेत, दरम्यान पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.
तुळजापूर तालुक्यातील हंगरगा नळ येथे 40, धाराशिव तालुक्यातील रुईभर या गावात 9 नंतर सिंदफळ येथे 13 अर्ज बोगस आधारकार्ड वापरून दाखल केले गेले त्यानंतर तुळजापूर मतदार संघातील जवळपास 100 पेक्षा अधिक मतदान केंद्रावर बोगस अर्ज नोंदणीचे प्रकार चावडी वाचन वेळी समोर आले. हंगरगा, रुईभर व सिंदफळ, काटीसह इतर गावातील कनेक्शन सेम असुन आधार एनरॉलमेंट नंबर सारखेच आहेत. हंगरगा गावात जे बोगस आधारकार्ड नामांकन क्रमांक वापरले गेले आहेत तेच क्रमांक सिंदफळ, रुईभर, काटी व इतर गावात वापरण्यात आले आहेत त्यामुळे या ठिकाणसह अन्य भागात एक मोठे रॅकेट असल्याच्या बाबीला पुष्टी मिळाली आहे. सिंदफळ, रुईभर व इतर 100 ठिकाणी वापरण्यात आलेले आधार कार्डचे नंबर अस्तित्वात नसुन सगळ्यांची वेळ व नंबर एकच आहे.आधार कार्डवर डिजीटल सहीमध्ये दिनांक व वेळ एकसमान असल्याचे आढळून आले, अर्ज भरताना कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी,ज्येष्ठ नागरिक यांचे फोटो वापरण्यात आले असुन त्यांच्या आधार कार्डवर स्थानिक गावचा पत्ता दाखवला आहे, जो की चुकीचा असुन ते स्थानिक रहिवासी नाहीत.
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील हंगरगा गावात बोगस नव मतदार अर्ज नोंदणी प्रकरणात 40 जणांवर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्या आदेशानंतर तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्याचा तपास तुळजापूर पोलीस करीत आहेत.